
पुणे, 02 जानेवारी (हिं.स.)। माझ्यावर एका महिलेने केलेले आरोप गलिच्छ आणि खोडसाळपणाचे तसेच निराधार आहेत. मी केवळ वरिष्ठांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठीच्या प्रक्रियेमध्ये कोर कमिटीचा अध्यक्ष म्हणून सहभागी होतो. या महिलेला पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी दापोडी प्रभाग क्रमांक ३० येथून उमेदवारी मिळाली नाही; म्हणून हे खोडसाळपणाचे आरोप केले आहेत. याबाबत मी पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. त्यांच्या निर्देशानुसार योग्य ती कारवाई या महिलेवर होईल, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवड जिल्हाप्रमुख माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
पत्रकार परिषदेस जिल्हा समन्वयक सुशीला पवार, जिल्हा संघटक अनिता तुतारे, वैभवी घोडके, वैशाली कुलथे, गौरी घंटे, वैशाली काटकर, बेबीताई सय्यद, योगिनी मोहन, यास्मिन शेख, आरती कांबळे, मीना राजपूत, भगवती नाटेकर, रोमी संधू, हाजी दस्तगीर मणियार, गोपाळ मोरे, गणेश आहेर, संजय वारे, कैलास नेवासकर, ज्ञानेश्वर शिंदे आदी उपस्थित होते. महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. महिला आरोप करत असलेला हा विषय दापोडी प्रभाग क्रमांक ३० येथील असून, त्यांनी अनुसूचित जाती जमातीच्या राखीव जागेवरून उमेदवारी मागितली होती. मात्र ती जागा पुरुष उमेदवारासाठी राखीव असल्यामुळे महिला उमेदवारांना तिकीट देण्यास निवड समितीने सर्वानुमते नकार दिला. पुरुष उमेदवार सक्षम असल्यामुळे महिलांना उमेदवारी द्यायची नाही असे सर्वानुमते ठरले. आपल्याला तिकीट मिळाले नाही तर मी चाबुकस्वार यांच्या कार्यालयासमोर जाळून घेईल अशी धमकी संबंधित महिलेले दिली. परंतु निवड प्रक्रियेमध्ये मी फक्त सहभागी होतो आणि सक्षम पुरुष उमेदवार असल्यामुळे सदर महिलेस उमेदवारी सर्वानुमते नाकारण्यात आली. मला महिलांविषयी आदर आहे. हे माझ्या राजकीय कारकिर्दीतील सहकारी जाणतात. सदर महिलेने व्देशापोटी माझ्यावर मानहानीकारक आरोप केले आहेत. यामागील बोलविता धनी कोणी वेगळाच आहे. लवकरच त्याचे नावही समोर येईल आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी जनतेला कळेल, असेही ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु