लातूर - जवळगा येथे एकदृष्टी महिला शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन
लातूर, 02 जानेवारी (हिं.स.) महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, त्यांना स्वावलंबी बनविता यावे यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत देवणी तालुक्यातील जवळगा येथे
लातूर - जवळगा येथे एकदृष्टी महिला शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन


लातूर, 02 जानेवारी (हिं.स.) महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, त्यांना स्वावलंबी बनविता यावे यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत देवणी तालुक्यातील जवळगा येथे महिला शेतक-यांसाठी उत्पादनक्षम अशी एकदृष्टी महिला शेतकरी उत्पादक कंपनी’ उभारण्यात येत असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन मंगळवारी गटविकास अधिकारी सागर वरंडेकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमास जिल्हा प्रशासनाचे मार्गदर्शन लाभले असून, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, प्रकल्प संचालक (डीआरडीए) संजय इंगळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे तसेच संस्थेच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या शेती आधारित उत्पादनास चालना देण्याचा या कंपनीचा मुख्य उद्देश आहे. भूमिपूजन प्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापक कल्पना लंगोटे, विडप, प्रभाग समन्वयक सुखदेव मलवाड, सिद्धार्थ बेद्रे, संतोष शेळके, राजेश बिरादार, जागा मालक हनुमंत बिरादार, कंपनीच्या संचालक पद्मिनताई गायकवाड, प्रतिमा प्रदीर्घ दवणहिप्पर्गेकर, मनिषा घाटगे यांच्यासह परिसरातील महिला शेतकरी उपस्थित होत्या. भविष्यात या महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून स्थानिक महिलांना उत्पादन, प्रक्रिया व विपणनाच्या संधी उपलब्ध होणार असून, त्यातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. जवळगा परिसरातील महिला शेतकरी वर्गासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande