
सोलापूर, 2 जानेवारी, (हिं.स.)। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सध्या रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे हातगाडे, चायनीज सेंटर, पान टपऱ्या रात्री अकरानंतर सुरू राहणार नाहीत. शहरात आता दररोज रात्री नऊ ते साडेअकरापर्यंत प्रत्येक पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, शहर गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस व तेथील गुन्हे प्रकटीकरण पथकांची (डीबी पथके) गस्त सुरु आहे.
सोलापूर शहरातील बहुतेक रस्त्यांलगत चायनीज, अंडाभुर्जी, वडापाव, भजीपाव, मच्छी फ्राय, चिकन-६५ असे हातगाडे पाहायला मिळतात. पान टपऱ्या, चहा कँटीन देखील रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्या ठिकाणी विनाकारण रात्रीच्या वेळी गर्दी दिसून येते. परवानगी नसताना देखील अनधिकृत हातगाडे रस्त्यांलगत दिसतात. दुसरीकडे, शहरातील मोकळ्या मैदानांवर देखील मद्यपींची मैफल रंगलेली असते.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता पोलिसांकडून घेतली जात आहे. शहरातील विजापूर नाका, एमआयडीसी, सदर बझार, फौजदार चावडी, जोडभावी पेठ, जेलरोड, सलगर वस्ती पोलिस ठाण्यातील डीबी पथक, पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांसमवेत स्थानिक पोलिसांचे पथक आणि शहर गुन्हे शाखेच्या साध्या वेशातील तीन पथकांची रात्री शहरात गस्त असणार आहे. दररोज एक पोलिस उपायुक्त रात्री १० ते ११ या वेळेत शहरातील स्थितीची पाहणी करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड