
पुणे, 2 जानेवारी (हिं.स.)। विकासकाला (बिल्डर) पैसे देऊनही घराचा ताबा न मिळालेले ग्राहक ‘महारेरा’मध्ये भरपाईसाठी धाव घेतात. या तक्रारींवर ‘महारेरा’कडून सुनावणी घेऊन ग्राहकांना भरपाई देण्याचे आदेश विकासकाला दिले जातात. ही भरपाई न देणाऱ्या विकासकांकडून त्याची वसुली करण्यासाठी ‘महारेरा’कडून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेते. ‘महारेरा’ने पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने घर खरेदीदारांची ४७ कोटी रुपयांची भरपाई मिळवून दिली आहे.
‘महारेरा’ने ग्राहकांना भरपाईचे आदेश देऊनही अनेक विकासक त्याचे पालन करीत नाहीत. अशा वेळी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे या विकासकांच्या वसुलीची वॉरंट पाठविली जातात. ‘महारेरा’ची मे २०१७ मध्ये स्थापना झाल्यापासून आतापर्यंत १ हजार २९१ तक्रारदारांच्या नुकसानभरपाईपोटी ७९२ कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, भरपाईची १०३ कोटी रुपयांची प्रकरणे राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यात वसुली होऊ शकलेली नाही, अशी माहिती ‘महारेरा’ने दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु