
पुणे, 02 जानेवारी (हिं.स.)। शिक्षक आणि पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने नुकताच जाहीर केला आहे. मात्र, या निर्णयास भावी शिक्षकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहार, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षेतील गोंधळ, आदी कारणांमुळे त्यांनी विरोध दर्शविला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी यांसारख्या परीक्षांचे आयोजन केले जाते. शिक्षक पदभरतीशी संबंधित परीक्षेचे आयोजन आणि निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणे आवश्यक आहे, अशा विचारातून शालेय शिक्षण विभागाने शिक्षक आणि पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविले आहे. परंतु, त्याला शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. २०१७ पासून शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होत असून, यापुढेही ती त्या पद्धतीने सुरू राहावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु