पुण्यात स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी रस्त्यावर
पुणे, 02 जानेवारी (हिं.स.)। जाहिरात सात महिने उशिरा आल्यामुळे वयोमर्यादेला फटका बसतो, यात आमची काय चूक? परीक्षेला अवघे तीन दिवस उरले आहेत, मात्र अद्याप सरकारतर्फे कोणतीही सकारात्मक निर्णय नाही. आम्ही अभ्यास करायचा की आंदोलन?’’ असा प्रश्‍न विद्यार्
पुण्यात स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी रस्त्यावर


पुणे, 02 जानेवारी (हिं.स.)। जाहिरात सात महिने उशिरा आल्यामुळे वयोमर्यादेला फटका बसतो, यात आमची काय चूक? परीक्षेला अवघे तीन दिवस उरले आहेत, मात्र अद्याप सरकारतर्फे कोणतीही सकारात्मक निर्णय नाही. आम्ही अभ्यास करायचा की आंदोलन?’’ असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ‘महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’ची जाहिरात जुलै २०२५ मध्ये प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. मात्र, ही जाहिरात सात महिने उशिरा प्रसिद्ध झाल्याने अनेक उमेदवारांना त्याचा मोठा फटका बसला आहे. वयोमर्यादा गणनेसाठी एक नोव्हेंबर २०२५ तारीख निश्‍चित केल्यामुळे अवघ्या काही दिवसांच्या फरकाने हजारो विद्यार्थी परीक्षेस अपात्र ठरले आहेत. अनेकदा पत्रव्यवहार, निवेदने देऊनही सरकारने कोणतीही दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी गुरुवारी (ता. १) शास्त्री रस्त्यावर आंदोलन केले. सरकार आणि आयोगाच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना नको. त्यामुळे ‘महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’ (विशेषतः पीएसआय) परीक्षेसाठीही वयोमर्यादेत शिथिलता द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह आमदार, खासदार आणि मंत्र्यांनीदेखील पाठपुरावा केला आहे. परीक्षा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली असतानाही अद्याप सरकारकडून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या विद्यार्थ्यांविषयी असलेल्या अनास्थेविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande