
सोलापूर, 2 जानेवारी, (हिं.स.)। महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. शनिवारी चिन्ह वाटपानंतर प्रचाराला सुरवात होईल. प्रमुख पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाल्या असून आता प्रचाराच्या निमित्ताने कोणीही कायद्याचे उल्लंघन करु नये, असे आवाहन शहर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी केले आहे. विनापरवाना शस्त्र बाळगणे, होर्डिंग्ज, बॅनर लावणे, रॅली काढणे, मोठ्या आवाजाचे ध्वनीक्षेपक लावणे, धार्मिक स्थळांचा प्रचारासाठी वापर करणे, अशा गोष्टी करु नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी सहापूर्वी ते रात्री दहानंतर कोणत्याही फिरत्या वाहनांवर व कोणत्याही परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचारासाठी फिरणाऱ्या वाहनांवरील ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, आवाजसह वाहनांना फिरता येणार नाही. सर्व उमेदवार व राजकीय पक्षांनी ठराविक ठिकाणी थांबून ध्वनीक्षेपकाद्वारे प्रचार करण्याची परवानगी घेतली असल्यास त्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिस ठाण्यास कळवावी, असे आवाहन देखील पोलिस आयुक्तांनी केले आहे. पोलिस आयुक्तांचे आदेश आदर्श आचारसंहिता संपेपर्यंत म्हणेच १५ जानेवारीपर्यंत लागू असणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड