
सोलापूर, 02 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील दूध उत्पादक सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे पशुखाद्याच्या किमतीत प्रचंड वाढ आणि चाराटंचाईने कंबरडे मोडले असताना, दुसरीकडे गेल्या सहा महिन्यांपासून दुधाच्या खरेदी दरात कोणतीही वाढ झालेली नाही. उत्पादन खर्च वाढूनही उत्पन्न घटल्याने दूध उत्पादक शेतकरी ''आर्थिक चक्रव्यूहात'' अडकला आहे.
राज्याचे दूध संकलन प्रतिदिन सुमारे दोन ते सव्वादोन कोटी लिटरपर्यंत होते. त्यात सर्वाधिक जवळपास ७० टक्के गाईंच्या दुधाचा समावेश आहे. सध्या गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३६ ते ३७ रुपये दर मिळत आहे. तर म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ५० ते ५२ रुपये मिळत आहेत. साधारण सहा महिन्यांपूर्वी १ जूनला गाईच्या दुधाचा दर १ रुपयांनी आणि म्हशीच्या दरात २ रुपयांनी कपात केली आहे. तेव्हापासून आजपर्यंत दूध दरात एक पैशांचीही वाढ झालेली नाही. राज्यातील एकूण दूध उत्पादनांपैकी दूध पावडर, बटर यासाठी ३५ ते ४० टक्के दूध वापरले जाते. तर उर्वरित ६०-६५ टक्क्यांपर्यंतचे दूध पिशव्यांमधून विकले जाते. सध्या प्रक्रियायुक्त पदार्थांचे दर मात्र चांगलेच तेजीत आहेत. उलट दुधाची कमतरता, या नावाखाली त्यांचे दर भरमसाट वाढलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड