
रायगड, 03 जानेवारी (हिं.स.)।रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात रायगड पोलिसांनी 2025 या वर्षात उल्लेखनीय कामगिरी बजावली असून तब्बल 99 टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरी, घरफोडी, खून, दरोडा, अपहरण, अत्याचार यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या एकूण 3 हजार 327 गुन्ह्यांपैकी 3 हजार 294 गुन्हे उघडकीस आणण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली.
पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात शुक्रवारी (दि. 2) आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, अलिबागचे पोलीस उपअधीक्षक माया मोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, खुनाचे 32 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 30 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. दरोड्याचे दाखल झालेले तिन्ही गुन्हे पोलिसांनी यशस्वीपणे उघडकीस आणले आहेत. घरफोडीचे 271 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 173 गुन्ह्यांची उकल झाली आहे. महिलांविरोधातील अत्याचाराचे 136 गुन्हे दाखल झाले होते. हे सर्व गुन्हे उघड करण्यात आले असून त्यातील 115 गुन्हे पोक्सो कायद्यांतर्गत आहेत.
अपहरणाचे 121 गुन्हे दाखल झाले असून 114 गुन्ह्यांची उकल झाली आहे. विनयभंगाचे 156 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 114 गुन्हे उघडकीस आले आहेत. याशिवाय जिल्ह्यात अवैध जुगार अड्ड्यांवर 115 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत सुमारे 56 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांनी 26 कारवाया केल्या असून त्यामध्ये तब्बल 1 कोटी 19 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कामगिरीमुळे रायगड पोलिसांची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके