“निवडणूक की व्यवहार? पनवेलमध्ये लोकशाहीचा लिलाव”
रायगड, 03 जानेवारी (हिं.स.)।पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात खळबळ उडवणारे आरोप समोर येत आहेत. लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत ‘बिनविरोध’च्या नावाखाली लोकशाहीचीच थट्टा केली जात असल्याची तीव्र चर्चा पनवेलकरांमध
निवडणूक की व्यवहार? पनवेलमध्ये लोकशाहीचा लिलाव


रायगड, 03 जानेवारी (हिं.स.)।पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात खळबळ उडवणारे आरोप समोर येत आहेत. लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत ‘बिनविरोध’च्या नावाखाली लोकशाहीचीच थट्टा केली जात असल्याची तीव्र चर्चा पनवेलकरांमध्ये सुरू आहे. ही निवडणूक आता केवळ सत्तासंघर्ष न राहता लोकशाही मूल्यांची कसोटी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.

२०२६ च्या निवडणुकीत काही प्रभागांमध्ये मतदारांऐवजी थेट उमेदवारांवरच प्रभाव टाकून निवडणूक रिंगण रिकामे करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आरोप होत आहेत. तब्बल ७ ते ८ उमेदवारांना प्रलोभन, दबाव किंवा राजकीय सौदेबाजीद्वारे माघार घेण्यास भाग पाडले जात असल्याची चर्चा आहे. यामुळे मतदारांचा मतदानाचा हक्क अप्रत्यक्षपणे हिरावला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, कचरा व्यवस्थापन आणि वीज यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी ‘उमेदवार फोडाफोडी’चे राजकारण रंगताना दिसत आहे. पैशाच्या बळावर किंवा सत्तेच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘नोटाशाही’चा उघड खेळ असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकारामुळे पनवेलच्या राजकीय संस्कृतीवर डाग लागत असल्याची टीकाही होत आहे.

महाविकास आघाडीबाबतही या घडामोडींमुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवला जात आहे. स्वार्थासाठी स्वाभिमान बाजूला ठेवणारे उमेदवार उद्या सत्तेत आल्यानंतर जनतेच्या हक्कांचा सौदा करतील, अशी भीती पनवेलकर व्यक्त करत आहेत. या ‘बाजारू’ राजकारणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पावित्र्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande