
रायगड, 03 जानेवारी (हिं.स.)।भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आपल्या बलिदानाने अजरामर ठसा उमटविणाऱ्या हुतात्मा बाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील या भारतमातेच्या दोन सुपुत्रांना
अभिवादन करण्यासाठी ८३ वा सिद्धगड बलिदान दिन मोठ्या भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शुक्रवार, दि. २ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता हुतात्मा चौक,
नेरळ (ता. कर्जत, जि. रायगड) येथे हुतात्मा गौरव पुरस्कार अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
पत्रकारांची समाजसेवी संस्था असलेल्या हुतात्मा स्मारक समिती, नेरळ यांच्या विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात हुतात्मा गौरव पुरस्कार २०२० इतिहास अभ्यासक व लेखक श्री. गिरीश कणटे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार खासदार सुनीलजी तटकरे, प्रदेशाध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन मंडळामार्फत संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे स्मारक उभारण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्जत-खालापूरचे आमदार श्री. महेंद्र थोरवे हे अनुपस्थित होते. मात्र सभेला निवृत्त सैनिक अर्जुन शिंदे, कुमार जाधव यांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून राहुल आरोटे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, नेरळ), प्रशासक सुजित धनगर, सैन्य दलातील निवृत्त जवान तसेच विशेष निमंत्रित कुशाग्र पटेल, किरण कांबरी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी हुतात्मा बाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या क्रांतिकारक कार्याचा गौरव करत त्यांच्या बलिदानाची आठवण करून दिली. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या वेळी स्वातंत्र्यसैनिक व हुतात्म्यांचे नातेवाईक शेखर भडसावळे, संध्या देवस्थळे, शरद भगत, शशिकांत पाटील, मल्हार पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले, तर केदार खडे यांनी “जय जय महाराष्ट्र” घोषणेने समारोप केला.
सिद्धगड बलिदान दिनानिमित्त आयोजित या अभिवादन सभेमुळे परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. हुतात्म्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी
आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके