
पुणे, 04 जानेवारी (हिं.स.)।
हडपसर-सय्यदनगरमधील गुंड टिपू पठाण टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या सराइताने लष्कर भागात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सराइताने आात्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (सुसाईड नोट) हडपसरमधील एका माजी नगरसेवकासह अन्य काही जणांची नावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सादिक हुसेन कपूर (वय ५६, रा. सय्यदनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शनिवारी रात्री उशीरा लष्कर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिक कपूर याचा लष्कर भागातील इस्ट परिसरातील कुमार पॅलेस सोसायटीत कार्यालय आहे. शनिवारी सायंकाळी त्याने कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेच माहिती मिळताच लष्कर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु