
सोलापूर, 04 जानेवारी (हिं.स.)। सोलापूरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. उमेदवारी अर्ज माघार घेण्यावरुन सोलापुरातील जोशी गल्ली येथे भाजपचे दोन गटात मोठा वाद झाला होता.शिंदे आणि सरवदे कुटुंबात झालेल्या वादात मनसेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती. आता बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील तीन आरोपींना 4 दिवसांची तर एका आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच आता मनसेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटूंबियांची भेट घेतली अन् त्यांचं सांत्वन केलं. त्यावेळी अमित ठाकरे देखील भावूक झाल्याचं पहायला मिळालं. सरवदे कुटुंबाची भेट घेत असताना अमित ठाकरे यांना अश्रू अनावर झाले. बाळासाहेब सरवदे लहान मुली आणि पत्नीला धीर देताना अमित ठाकरे भावुक झाल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी अमित ठाकरे संतापल्याचं देखील दिसून आलं.बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर शिंदे यांचा भाचा राहुल सरवदे याने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. राहुलच्या दाव्यानुसार, बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी हातात तलवार, कोयता आणि काठ्यांसारखी घातक शस्त्रे घेऊन शिंदे यांच्या घरात घुसून मारहाण केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड