अमरावती मनपा निवडणूक : प्रमुख पक्षांचे जाहीरनामे अंतिम टप्प्यात
अमरावती, 04 जानेवारी (हिं.स.)। अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आता जाहीरनामे प्रसिद्ध करण्याच्या तयारीत आहेत. अमरावतीतील २२ प्रभागांमधून ८७ नगरसेवक निवडले जाणार असू
अमरावती मनपा निवडणूक: प्रमुख पक्षांचे जाहीरनामे अंतिम टप्यात


अमरावती, 04 जानेवारी (हिं.स.)। अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आता जाहीरनामे प्रसिद्ध करण्याच्या तयारीत आहेत. अमरावतीतील २२ प्रभागांमधून ८७ नगरसेवक निवडले जाणार असून, यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. ३ जानेवारी रोजी चिन्ह वाटप पूर्ण झाल्याने सर्व उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.

भाजपच्या जाहीरनाम्याची सूत्रे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्याकडे आहेत, तर काँग्रेसच्या जाहीरनाम्याला त्यांचे प्रदेश प्रवक्ते आणि माजी महापौर मिलिंद चिमोटे आकार देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने माजी महापौर ॲड. किशोर शेळके यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे, तर शिवसेनेने (उबाठा गट) जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वाखाली जाहीरनामा तयार केला आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्याकडे जाहीरनाम्याची जबाबदारी आहे.

भाजपने केंद्र आणि राज्य सरकारच्या धर्तीवर 'विकसित अमरावती-सुरक्षित अमरावती' हा मुद्दा जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी ठेवला आहे. जनतेला सर्व आवश्यक सुविधा पुरवण्यासोबतच शहराचा वेगाने विकास करण्याचा संकल्प भाजपने केला आहे. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने विकासाला गती मिळेल, असे निवडणूक प्रमुख जयंत डेहनकर यांनी सांगितले.

काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या मते, गेल्या तीन-चार वर्षांपासून मनपात प्रशासकीय भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केंद्र आणि राज्यात एकसुरी सत्ता असल्याने मनपातील तत्कालीन सत्तापक्षाचीही या भ्रष्टाचाराला मूक संमती होती. कचरा संकलन नियमित होत नाही आणि प्रशासनाने करवाढ रद्द करण्याची स्थगितीही नकळतपणे उठवली, असे काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यातून मांडणार आहे. रेल्वे स्टेशन विक्रीला काढण्याचा भाजपचा डाव हाणून पाडल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शहराचे माजी महापौर ॲड. किशोर शेळके यांनी सांगितले की, जाहीरनामा हा पक्ष आणि जनतेदरम्यानचा करार असतो. यापूर्वी सत्तेत असताना दिलेले सुशासन यावेळीही देऊ. त्या काळात केलेली विकासकामे जनतेसमोर मांडली जातील. जिल्ह्यात पक्षाचे दोन आमदार, राज्याच्या सत्तेतील सहभाग आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे असलेली राज्याच्या तिजोरीची चावी या सर्व बाबी अमरावतीकरांच्या हितासाठी महत्त्वाच्या ठरतील.

शिवसेना (उबाठा गट) जिल्हाप्रमुख पराग गुडधे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडून शहरातील मैदाने गिळंकृत केली जात आहेत. याला आळा घालण्याचे काम पक्ष करेल. पार्किंग झोन, हॉकर्स झोन आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांवर आम्ही जनमताचा कौल मिळवणार आहोत. शिवसेनेचे (शिंदे गट) कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्या मते, त्यांचा जाहीरनामा अंतिम टप्प्यात असून तो ६ जानेवारीनंतर अमरावतीकरांपर्यंत पोहोचेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande