
सोलापूर, 04 जानेवारी (हिं.स.)। गावातील नागरिकांना पॅनकार्ड, शासकीय योजनांच्या लाभाचे अर्ज, विविध विमा योजना, रिचार्ज, वाहन चालविण्याचा परवाना अशा सेवा गावातील आपले सरकार सेवा केंद्रातून (सीएससी) दिल्या जातात. पीकविमा भरणे, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक संकटातील शेतकऱ्यांचे अर्ज भरणे अशीही कामे येथून होतात. पण, आता ज्या केंद्र चालकाने एक वर्षापूर्वी केंद्र सुरू केले, त्यांची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ६०० केंद्रांचे आयडी लॉक करण्यात आले आहेत.
आपले सरकार सेवा केंद्र चालक असल्याचा बनावट आयडी, बॅनर लावून अनेकांनी शासनाचीच फसवणूक केली आहे. शासकीय योजनांचे अर्ज भरताना बनावट केंद्र चालक निश्चित रकमेपेक्षा जास्त रक्कम घेतात. या तक्रारींच्या अनुषंगाने आता नव्याने सीएससी केंद्रास मान्यता घेतलेल्या (एक वर्षापर्यंत) सर्वांचीच पडताळणी केली जात आहे. त्यासाठी त्या केंद्र चालकांना स्वत:ची पोलिसांच्या माध्यमातून चारित्र्य पडताळणी देखील करून घ्यावी लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड