
मुंबई, 04 जानेवारी (हिं.स.)। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमधील प्रभाग क्रमांक १०७ सध्या राजकीय रणधुमाळीचं केंद्र ठरत आहे. भाजपचे उमेदवार नील सोमय्या यांच्या विरोधात मैदानात उतरलेले दिनेश जाधव यांनी सोमय्या यांच्यावर दमदाटी आणि दहशत निर्माण केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. “नील सोमय्यांनी अनेकांना धमकावलं असेल, पण मला धमकावण्याची त्यांची हिंमत नाही,” अशा ठाम शब्दांत जाधव यांनी सोमय्या यांना थेट आव्हान दिलं आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक १०७ मधून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने स्वतःचा उमेदवार न दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. मुळात ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे होती. मात्र त्यांचा अर्ज बाद झाल्याने नील सोमय्यांचा विजय सोपा मानला जात होता.
दिनेश जाधव यांनी सांगितले की, नील सोमय्या काहीतरी गडबड करू शकतात, याची शंका आधीपासूनच होती. त्यामुळेच सावधगिरी म्हणून आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे, जाधव हेच शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत उमेदवार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे या प्रभागातील लढत अधिकच रंगतदार बनली आहे.
प्रभाग क्रमांक १०७ हा प्रामुख्याने मराठी भाषिक मतदारांचा प्रभाग असून, या वॉर्डवर ठाकरे गटासह राष्ट्रवादीचीही नजर होती. मात्र भविष्यात काहीतरी अडचण निर्माण होऊ शकते, असा अंदाज घेत जाधव यांनी आधीच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता राजकीय घडामोडींमुळे तेच प्रमुख आव्हान म्हणून पुढे आले आहेत. त्यांचे चिन्ह दूरदर्शन संच आहे.
नील सोमय्या यांच्यावर प्रचारादरम्यान दहशत निर्माण केल्याचा आरोप करताना जाधव म्हणाले की, सोमय्यांनी आतापर्यंत अनेकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अशा धमक्यांना आपण घाबरत नसून, या प्रभागातील जनता मराठी अस्मिता आणि हक्काच्या प्रतिनिधीसाठी आपल्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुलुंडमधील या प्रभागातून महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार नसल्याने किंवा तांत्रिक कारणांमुळे अर्ज बाद झाल्याने दिनेश जाधव हे नील सोमय्यांसमोर तगडे आव्हान ठरत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जाधव यांना अंतर्गत पाठिंबा असल्याची चर्चा सुरू असतानाच, संजय राऊत यांनी जाधव हेच शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार असल्याचे स्पष्ट केल्याने प्रभाग १०७ मधील लढत अधिकच निर्णायक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule