
बीड, 04 जानेवारी (हिं.स.)।
बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. त्यामुळे ख्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, तूर आणि राजमा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. थंडी गायब झाली. आर्द्रता वाढली. त्यामुळे बुरशीजन्य रोगांना पोषक वातावरण तयार झाले. शेतकरी आता फवारणीकडे वळले आहेत.
हरभरा सध्या फुलोऱ्यात आहे. या पिकावर घाटा अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ओलाव्यामुळे मूळ कुज आणि मर रोगाची भीती निर्माण झाली आहे. ज्वारीवर चिकटा आणि लष्करी अळीचा धोका वाढला आहे. ढगाळ हवामानामुळे पिकाची वाढ
खुंटण्याची शक्यता आहे. तूर काढणीस आली आहे. या पिकावर शेंगा पोखरणारी अळी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. त्यामुळे शेंगा काळ्या पडत आहेत. तज्ज्ञांनी पीक संरक्षणासाठी उपाय सुचवले आहेत. ढगाळ वातावरणाचा राजमा पिकावर मोठा परिणाम दिसून येत आहे.
फवारणी करताना हवामान कोरडे असल्याची खात्री करावी. पावसाचा अंदाज असल्यास फवारणी टाळावी. यंदा जिल्ह्यात समाधानकारक रब्बी पेरण्या झाल्या आहेत. हरभरा आणि ज्वारीचा पेरा मोठा आहे. मात्र, चांगल्या उत्पादनामुळे शेतकरी हरभऱ्याऐवजी राजमा पिकाकडे वळले आहेत.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis