
चंद्रपूर, 04 जानेवारी (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चंद्रपूरमध्ये भव्य रोड शो झाला. आज ज्या प्रकाराचा रोड शो आपल्या सर्वांच्या उपस्थित मी पाहिला. तो पाहून आता मी दाव्याने सांगतो चंद्रपूरवर भाजप - शिवसेनाच भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही
फडणवीस यांनी चंद्रपूरच्या आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन घेत चंद्रपूरात भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडून विजय संकल्प यात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, मागच्या काळात आमचे सुधीर मुनगंटीवार हे पालकमंत्री असताना, हंसराज अहिर खासदार असताना,किशोर जोरगेवार आमदार असताना चंद्रपूर शहराचा चेहरा बदलवण्याचे काम केले. या चंद्रपूरमध्ये जर काही दिसत असेल तर त्याचे श्रेय भाजप- शिवसेना महायुतीचे आहे. भाजप शिवसेनेशिवाय इथे कोणी काम केले नाही. चंद्रपूरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम भाजप शिवसेनेने केले आहे,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पिण्याच्या पाण्याची योजना, गटाराची योजना, पथदिव्याची योजना, घरे देण्याची योजना असेल.. चंद्रपूरचा चेहरा बदलण्याचे काम याठिकाणी झाले. म्हणूनच पुन्हा एकदा आलोय.. आपल्या देशाचे नेते मोदींनी शहरांसाठी ५० कोटींचा निधी दिला आहे. पण चंद्रपूरसाठी आम्ही पैसा आणला आणि इथे महापालिकेत कोणी दलाल बसले, भ्रष्ट बसले, अनाचारी, दुराचारी बसले तर चंद्रपूरचा विकास होणार नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
दरम्यान, चंद्रपूरचा कायापालट करण्याकरिता, चेहरा मोहरा बदलण्याकरिता एकदा भाजप- शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब करावे, चंद्रपूरकरांनो १५ तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, १६ तारखेपासून पाच वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव