
पुणे, 04 जानेवारी (हिं.स.)।
पुणे-मुंबई द्रुतगतीवरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’चे काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अत्याधुनिक केबल स्टेड पुलाचा या कामात समावेश आहे. या पुलाच्या दोन टोकांना जोडण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) देण्यात आल्या आहेत.
द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शक्य तिथे विस्तारीकरणाचे काम भाजप-महायुती सरकारने हाती घेतले आहे. याचाच भाग म्हणून ‘मिसिंग लिंक’ जोडली जात आहे. पुणे-मुंबई प्रवासाचा कालावधी कमी होण्याने पुण्याच्या अर्थकारणाला गती मिळणार आहे. पुण्यातील गुंतवणूक वाढवण्यास याचा लाभ होईल, असे उद्योग जगतामधील विश्लेषकांचे मत आहे.
पुण्याच्या आर्थिक विकासाला चालना देणारा पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग भाजप-महायुतीच्या काळातच सुमारे २५ वर्षांपूर्वी बांधला गेला. लोणावळा-खोपोली परिसरातील घाटमार्गावर वाहनांचा वेग कमी होत असल्यामुळे प्रवासाचा वेळ वाढत होता. त्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा प्रारंभ केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु