अमरावती : अपक्षांना घरगुती वस्तू, फळे, वाहनांसह मिळाली अनेक चिन्हे
अमरावती, 04 जानेवारी (हिं.स.) अमरावती येथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर शनिवारी सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यात राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पक्षाची चिन्हे मिळाली, तर अपक्ष उमेदवारांना विविध प्र
अपक्षांना घरगुती वस्तू, फळे, वाहनांसह मिळाली अनेक चिन्हे


अमरावती, 04 जानेवारी (हिं.स.)

अमरावती येथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर शनिवारी सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यात राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पक्षाची चिन्हे मिळाली, तर अपक्ष उमेदवारांना विविध प्रकारची चिन्हे देण्यात आली. यामुळे मतदान यंत्रावर (ईव्हीएम) अक्षरशः 'डिपार्टमेंटल स्टोअर'सारखे चित्र दिसणार आहे.

भारतीय जनता पक्षाला कमळ, काँग्रेसला हात (पंजा), शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मशाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (राकाँ) घड्याळ, शिवसेनेला धनुष्यबाण, बहुजन समाज पार्टीला हत्ती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (शरदचंद्र पवार) तुतारी वाजवणारा माणूस, प्रहारला बॅट, युवा स्वाभिमान पार्टीला पाना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रेल्वे इंजिन, ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनला (एमआयएम) पतंग, इंडियन मुस्लिम लीगला शिडी, समाजवादी पार्टीला सायकल, वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलिंडर आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकला सिंह ही राखीव निवडणूक चिन्हे मिळाली आहेत.

याउलट, अपक्ष उमेदवारांना मागणीनुसार विविध प्रकारची चिन्हे मिळाली आहेत. यात दूरदर्शन संच, कंगवा, किटली, कप-बशी, जग, ऑटोरिक्षा यांसारख्या घरगुती वस्तूंचा समावेश आहे. एका प्रभागातील प्रत्येक उमेदवाराला भिन्न चिन्ह देणे आवश्यक असल्याने, ही विविधता दिसून येते.

याशिवाय, एअर कंडीशनर, रोड रोलर, ट्रॅक्टर, विजेरी (टॉर्च), सफरचंद, काडीपेटी, शिटी, नारळ, झाडू, नगारा, पेटी (संदूक), शिवणयंत्र, पांगुळगाडा, संगणक आणि फळा अशी अनेक चिन्हेही मतदान यंत्रावर दिसणार आहेत.

महापालिकेचे मतदान १५ जानेवारी रोजी होणार आहे. यावेळी मतदारांपुढे येणाऱ्या मतपत्रिकेवर (ईव्हीएम) उमेदवारांचा क्रम निश्चित करण्यात आला आहे. सर्वात वर भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या आणि राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नावे असतील. त्यानंतर भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या इतर राज्यातील (महाराष्ट्राव्यतिरिक्त) राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार असतील. तिसऱ्या टप्प्यात राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेल्या अमान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार असतील, तर शेवटच्या टप्प्यात अपक्ष उमेदवारांची नावे दिसतील.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande