
सोलापूर, 04 जानेवारी (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिका निवडणूक भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहे. या निवडणुकीत सोलापुरातील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना भाजपने पक्षात घेतले पण तिकीट वाटप करताना 75 टक्के मूळ भाजप कार्यकर्त्यांना तिकिटे दिली आणि 25% भाजपमध्ये प्रवेश केलेल्या इतर पक्षातील नेत्यांना तिकिटे दिली.
विशेष बाब म्हणजे या २५ टक्क्यांमधील बहुतांश तिकिटे ज्या ठिकाणी भाजप कधीच विजयी झाला नाही अशांवर लक्ष केंद्रित करत पालकमंत्री गोरे यांनी बाहेरच्या पक्षातून आलेल्या माजी आमदार दिलीप माने, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, गणेश वानकर, किसन जाधव, नागेश गायकवाड, पद्माकर काळे, बिज्जू प्रधाने, विनोद भोसले, अंबादास करगुळे यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या प्रभागांमध्ये देण्यात आली आहेत.
माझा कार्यकर्ता म्हणजेच पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असे समीकरण महापालिकेच्या दरम्यान निर्माण केले होते. याला छेद देत भाजपाने सोलापूर शहराचे राजकारण व्यक्तिकेंद्रित न करता पक्षकेंद्रित करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
गटातटाच्या राजकारणाकडे लक्ष न देता वरिष्ठांच्या भूमिकेनुसार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी नगरसेवक शिवानंद पाटील आणि माजी नगरसेवक नरेंद्र काळे यांचा राजकीय बळी जाऊ न देता त्यांना न्याय देण्याचे काम केल्याचे दिसते. नरेंद्र काळे सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्याने अनेकांना आनंद झाला आहे.
यंदा भाजपाची वाटचाल महापालिका निवडणुकीत मागील वेळेपेक्षा अधिक जास्त जागा मिळवण्याकडे सुरू झाली आहे, निवडणूक लागण्याच्या दिवशी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यंदा भाजप सोलापुरात सिक्सटी प्लस होईल अशी घोषणा केली होती त्याला अनुसरूनच विरोधकांना चेकमेट देत त्यांनी ‘मास्टरस्ट्रोक’ मारल्याचे दिसून येते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड