
अमरावती, 4 जानेवारी, (हिं.स.)। शेंदूरजना बाजार, शिरजगाव मोझरी नंतर आता बिबट्याने निंभोरा मार्गे डेहणी शेतशिवारात धाव घेत झाडावर वास्तव्यास बसलेल्या माकडाची शिकार करून ठार केले आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तिवसा तालुक्यात बिबट्याचा वावर सुरू असून, कुठे ना कुठे तो धाव घेत प्राण्यांची जीवितहानी करीत आहे.
शिरजगाव मोझरी येथे बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातल्यानंतर त्याने निंभोरा-डेहणी शेतशिवारात धाव घेतली आहे. तेथील निलेश राहान यांच्या शेतातील आंब्याच्या झाडावर रात्रीच्या अंधारात बसलेल्या माकडाच्या कळपावर बिबट्याने झडप घालून त्यातील एका माकडाची शिकार करून त्यास ठार केले. शनिवारी सकाळी शेतकरी निलेश राहान हे शेतात गेले असता त्यांना हा प्रकार दिसून आला. त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली असता कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी