
लातूर, 04 जानेवारी (हिं.स.)।
राष्ट्रवादी'च्या प्रचाराचा शुभारंभ
लातूर मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ६० जागावर लढत असून पक्षाला नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. शहरातील मतदारांनीच ही निवडणूक आता डोक्यावर घेतली असल्याचे दिसून येत आहे.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, आ. विक्रम काळे, शहराध्यक्ष मकरंद सावे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, प्रचार समिती सदस्य बळवंत जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष
अफसर बाबा शेख, प्रदेश सरचिटणीस व्यंकटराव बेद्रे, बबन भोसले, मूर्तुजा खान, इब्राहिम सय्यद यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मनपाच्या ७० जागांपैकी ५७ ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत एकही अर्ज मागे घेतला नाही. याशिवाय पक्षाने प्रभाग क्रमांक ९ मधील ३ अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केले आहे. त्यामुळे एकूण ६० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवत आहे.
लातूरमध्ये प्रथमच तिरंगी लढत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच लातूरमध्ये तिरंगी निवडणूक होत असल्याचे दिसून येत आहे. लातूर महानगरपालिका आणि नगरपरिषदेच्या इतिहासातही कधीच तिरंगी लढत झाली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आली आहे. एका अर्थाने हा राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय मानला जात आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा सुरू आहे. नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते एकसंघपणे झोकून देऊन प्रचार करत आहेत. प्रभागनिहाय प्रचाराचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे. अशी माहिती प्रदेश सचिव इब्राहिम सय्यद यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis