
परभणी, 04 जानेवारी (हिं.स.)। परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटात अचानक वाद उफाळून आला. घटनेची माहिती मिळताच नवा मोंढा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गर्दी पांगविली. या प्रकरणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून आरोप - प्रत्यारोप करण्यात आले. नवा मोंढा पोलिसांत या प्रकरणी वामण मोरे आणी विजय काळे यांनी परस्परविरोधी तक्रार दिली आहे.
प्रभाग क्रमांक चार मधील देशमुख हॉटेल परिसरात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने शाब्दिक वाद उफाळून आला. पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळळा. घटनेनंतर दोन्ही गटाचे कार्यकर्त्यांनी नवा मोंढा पोलिस ठाणे परिसरात मोठी गर्दी केली होती.
दरम्यान या प्रकरणाने परभणी महानगरपालिका निवडणुकीदरम्यान अनेक प्रभागात मोठी चुरस असल्याचे पहावयास मिळाले. तसेच निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी इतर पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक राजकीय परिस्थिती अधिकच गुंतागुंतीचे बनली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नवा मोंढा पोलिसांनी शहरात पोलिसांची अतिरिक्त कुमक, रात्र पेट्रोलिंग आदी सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम केल्याचे नवा मोंढा पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis