
परभणी, 04 जानेवारी (हिं.स.)।
एकेकाळचा बलाढ्य असलेला काँग्रेस पक्ष आता तसा राहिला नाही, परभणीत तर काँग्रेसची फारच दयनीय अवस्था झाली आहे, त्यांचे २८ पैकी १० उमेदवार मुस्लिम आहेत, आणि उर्वरित उमेदवार हे नातेवाईक आहेत, असा आरोप करत मुस्लिम समाजाने राजकीय नेतृत्व मिळविण्यासाठी आणि संविधान संरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचे आवाहन अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते परभणी महानगरपालिका निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील राहुलनगर परिसरातील मैदानात आयोजित प्रचार सभेत रविवारी बोलत होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार, शहराध्यक्ष मुद्दशीर असरार व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना अँड. आंबेडकर म्हणाले की, येथील काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांचे राजकारण आम्हीच सुरू केले असून ते काय प्राणी आहेत हे आम्हाला चांगले माहित आहे, ते काँग्रेसचे वाट लावायला निघाले असल्याचा आरोप करत आजपर्यंत काँग्रेस शरद पवारांच्या नादी लागल्याने मोठे नुकसान केल्याचा आरोपही येथे अँड. आंबेडकर यांनी केला. तर भारतीय जनता पक्ष हा धर्माच्या नावावर राजकारण करणारा पक्ष असून या मनपा निवडणुकीत त्यांनी किती आलुतेदार - बलुतेदार समूहातील लोकांना उमेदवारी दिली? असा सवाल केला.
परभणीत या मनपा निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष एकत्र येतील, असा अंदाज व्यक्त केला. वंचित समूहाला नेतृत्व मिळविण्यासाठी मतदानाच्या माध्यमातून योग्य उमेदवार निवडण्याची संधी मिळाली आहे, ही संधी साधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. या प्रचार सभेस मतदार, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis