
सोलापूर, 04 जानेवारी (हिं.स.)। शेतकरी कामगार पक्ष हा कोणत्याही एका कुटुंबाचा नसून तो शेतकरी व कष्टकरी जनतेचा आहे. येणाऱ्या निवडणुकांबाबत कार्यकर्ते जो निर्णय देतील, तोच निर्णय स्वीकारून त्याप्रमाणे भूमिका घेतली जाईल, असे स्पष्ट आश्वासन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिले.
सांगोला येथील रामकृष्ण व्हिला गार्डन येथे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. आमदार डॉ. देशमुख पुढे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शेकाप आघाडीला शहरात पराभव स्वीकारावा लागला. त्या पराभवाची नैतिक जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो. यापुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते ज्या दिशेने निर्णय देतील, त्या दिशेने आघाडी अथवा स्वतंत्र निर्णय घेतला जाईल. स्व. आबासाहेबांच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव असून तो विचार मी कधीही तडा जाऊ देणार नाही.
हिवाळी अधिवेशनात सांगोला शहर व तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवला आहे. यामध्ये शहरातील नागरी प्रश्नांसह चारा छावणीच्या प्रलंबित अनुदानाचा मुद्दा मांडण्यात आला असून तो मार्गी लागण्याच्या प्रक्रियेत आहे. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली आहे. तसेच सकाळ-संध्याकाळचे लोडशेडिंग बंद करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड