
अमरावती, 04 जानेवारी (हिं.स.)। मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात दोन अल्पवयीन मुलींवर मातृत्व लादल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या असून, नववर्षातील अत्याचाराचे पहिले दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या दोन्ही मुलींची जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती येथे प्रसूती झाली असून, गर्भधारणेच्या वेळी त्या अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी संबंधित संशयितांविरुद्ध बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, घटनास्थळ धारणी व चिखलदरा तालुक्यातील असल्याने गुन्हे संबंधित पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आले आहेत.
धारणी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी २ जानेवारी रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. संबंधित मुलीची जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूती झाली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, चिखलदरा तालुक्यातही अशीच घटना शनिवारी रात्री समोर आली आहे. चिखलदरा पोलिसांनी विशाल नामक संशयिताविरुद्ध २ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. संशयित व अल्पवयीन मुलीमध्ये प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येत असून, ती स्वेच्छेने त्याच्या घरी राहायला गेली होती. त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. या अल्पवयीन मुलीची १५ डिसेंबर रोजी प्रसूती झाली होती. बालविवाह व लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी प्रशासन विविध मोहिमा राबवत असले तरी मेळघाटात अशा प्रथा अद्यापही सुरू असल्याचे या घटनांतून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणांमुळे ग्रामीण भागातील बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी