
मुंबई, 04 जानेवारी (हिं.स.)। ऐन निवडणुकीच्या धामधुमीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईच्या माजी महापौर आणि शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा शुभा राऊळ यांनी शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला आहे. शुभा राऊळ यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपलं राजीनामा पत्र सुपूर्द केलं असून, त्यांनी शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षपदासह शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.
या राजीनामा पत्रात शुभा राऊळ म्हणतात की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि आपल्या नेतृत्वावर अढळ विश्वास ठेवून शिवसेनेत कार्यरत राहिले आहे. मात्र काही कारणास्तव मला शिवसेना अंतर्गत शिवआरोग्य सेनेच्या अध्यक्ष या पदाचा तसेच शिवसेना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. आपणाकडून मिळालेल्या आजपर्यंतच्या सहकार्याबद्दल मी आभार व्यक्त करते.
राजीनाम्यानंतर शुभा राऊळ यांनी भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही भेट आमदार प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी झाल्याचं सांगण्यात येत असून, त्यानंतर शुभा राऊळ लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, याआधीही शुभा राऊळ यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. विनोद घोसाळकर यांच्या कार्यपद्धतीवर शुभा राऊळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी शुभा राऊळ यांनी पक्षाचा राजीनामा देत मनसेत प्रवेश केला होता. त्यांनी मनसेकडून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांना यश आले नाही. मात्र निवडणूक झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यात शुभा राऊळ स्वगृही परतल्या होत्या. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पुन्हा पक्षात स्वागत केले होते. परंतु आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शुभा राऊळ यांनी पुन्हा पक्षाची साथ सोडली आहे.
शुभा राऊळ या ठाकरेंच्या शिवसेनेतील एक प्रमुख महिला नेत्या मानल्या जातात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या युतीचा वचननामा जाहीर केलेल्या दिवशीच शुभा राऊळ यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात एका मोठ्या महिला नेत्याने साथ सोडल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात असून, आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule