
ठाणे, 04 जानेवारी (हिं.स.)। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर अर्ज मागे घेण्यासाठी थेट दबाव टाकला जात असून, पोलिस यंत्रणेचा गैरवापर आणि सत्तेचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप दोन्ही पक्षांनी केला आहे. यासंदर्भात मनसे नेते अविनाश जाधव आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
पत्रकार परिषदेत अविनाश जाधव यांनी दावा केला की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी एका पोलिस अधिकाऱ्यामार्फत त्यांच्या उमेदवाराला नेण्यात आल्याचा व्हिडिओ त्यांच्या ताब्यात आहे. विक्रांत घाग नावाचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत होता. त्याने अर्ज भरल्यानंतर त्याला एका पोलिस अधिकाऱ्यासोबत थेट एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर नेण्यात आले आणि त्यानंतर त्याने अर्ज मागे घेतला. या संपूर्ण घटनेची वेळ तपासली तर तो बंगल्यावर कधी गेला आणि अर्ज कधी मागे घेतला, हे स्पष्टपणे जुळून येईल, असा दावाही जाधव यांनी केला.
ही संपूर्ण निवडणूक पोलिसांच्या दबावाखाली आणि पैशांच्या जोरावर लढवली जात असल्याचा आरोप करत अविनाश जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. निवडणूक आयोगाला जर पुराव्यांची आवश्यकता असेल, तर आम्ही ते देण्यास तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांचा वापर करून उमेदवारांवर दबाव आणला जात असेल, तर ती लोकशाहीसाठी अत्यंत घातक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अविनाश जाधव यांनी वागळे विभागातील निवडणूक अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले. वृषाली पाटील आणि सत्वशिला शिंदे या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सांगितले की, अर्ज डिस्प्ले करण्याच्या वेळेत आणि प्रक्रियेत गंभीर चुका झाल्या. सकाळी अकराच्या आधी अर्ज डिस्प्ले करणे अपेक्षित असताना ते थेट साडेतीन वाजता करण्यात आले आणि तो फॉर्मही चुकीचा होता. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी माफी मागितली असल्याचा दावाही त्यांनी केला.
ठाण्यातील तीन प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून येण्यामागे याच अधिकाऱ्यांची भूमिका असल्याचा आरोप करत, अपक्ष उमेदवारांचे अर्ज का मागे घेण्यात आले किंवा रद्द करण्यात आले, त्यांना अपात्र का ठरवले गेले, याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. या दोन्ही महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली निष्पक्ष निवडणूक होऊ शकत नाही, त्यामुळे नवीन निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
दरम्यान, पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांचा “पाहुणचार केला जाईल” आणि अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांचा चांगलाच समाचार घेतला जाईल, असा इशाराही अविनाश जाधव यांनी यावेळी दिला. या आरोपांमुळे ठाणे महापालिका निवडणुकीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule