
परभणी, 04 जानेवारी (हिं.स.)।
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीतील लढतीचं चित्र स्पष्ट झाल्याबरोबर प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रबळ उमेदवारांसह अन्य पक्ष व बंडखोर उमेदवारांनी दहा दिवसांचा अल्प कालावधी ओळखून स्वतःस प्रचारयुध्दात जूंपले आहे.
शुक्रवार 2 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीकरीता राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींसह त्या त्या प्रभागातील प्रबळ उमेदवारांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यात काहींना यश मिळाले, तर काहींच्या पदरात अपयश पडले. परंतु, लढतीचं चित्र लगेचच स्पष्ट झाले. त्यामुळे त्या त्या प्रभागातील प्रबळ उमेदवारांनी तात्काळ प्रत्यक्ष लढतीवर लक्ष केंद्रीत केले.
निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून प्रबळ उमेदवार व त्यांचे समर्थक प्रचारयुध्दावर जूंपले होते. परंतु, प्रत्यक्ष लढतीचं चित्र स्पष्ट झाल्याबरोबर या प्रबळ उमेदवारांनी कुटूंबातील सार्या सदस्यांना वेगवेगळ्या जबाबदार्या सुपूर्त केल्या. स्वतःची प्रचार यंत्रणा तसेच सौभाग्यवती असो किंवा मुलांच्या स्वतंत्र प्रचार यंत्रणा बांधणीचा प्रयत्न सुरु केला. काही उमेदवारांनी त्यांचे नाते-गोते, सगे-सोयरे व मित्र परिवारांना पाचारण करीत त्यांच्याद्वारेही स्वतंत्र प्रचार यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न सुरु केला. या व्यतिरिक्त मतदार यादीची छाननी, त्यातील अनुकूल असणारे मतदार, आग्रह केल्यानंतर मिळू शकणारे मतदान किंवा न मिळणारेही मतदान या गोष्टीचाही या प्रबळ उमेदवारांनी अंदाज घ्यावयास सुरुवात केली. बाहेरगावी असणार्या मतदारांना मतदानाकरीता परभणीत कसं आणता येईल, या दृष्टीनेही प्रयत्नांची पराकाष्टा सुरु केली. त्यासाठी खास यंत्रणा उभारुन बाहेरगावी असणार्या मतदारांशी संपर्क साधण्याचा, त्या ठिकाणी स्वतंत्र अशी कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचा प्रयत्न सुरु केला.
प्रचार साहित्य तसेच जाहीरनामे, परिचयनामे व आजपर्यंत केलेल्या कामांचा आढावा असणार्या पुस्तिका तातडीने बाहेर काढल्या व हे साहित्य सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचविण्याकरीता व्यूहरचना सुरु केली. त्याचबरोबर आपल्या खास कार्यकर्त्यांबरोबर या प्रबळ इच्छुकांनी शुक्रवारी संध्याकाळपासून गुफ्तगू सुरु केले. या निवडणूका सोप्या नाहीत, या लढती अत्यंत अटीतटीच्या आहेत, तूल्यबळ आहेत. त्यामुळे कोणीही कोणत्याही आत्मविश्वासात वावरु नका, हे दहा दिवस महत्वाचे आहेत. डोअर टू डोअर प्रचार केल्याशिवाय पर्याय नाही, अशा सक्त सूचना या प्रमुख उमेदवारांनी आपआपल्या कट्टर समर्थकांना दिल्या. तसेच पॅनल टू पॅनलच मतदान मागा, असेही आवर्जून नमूद केले.
या प्रबळ उमेदवारांनी सोशल मिडीयासह अन्य पर्यायाच्या माध्यमातून सामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्याकरीता अन्य कसरती करण्याचाही प्रयत्न सुरु केला.
मेळावे अन् सभा नको...
दहा दिवसांच्या या अल्प कालावधीत आपआपल्या कार्यक्षेत्रातच डोअर टू डोअर संपर्क साधण्याचा प्रबळ उमेदवारांनी संकल्प सोडला आहे. पक्षस्तरावरील मेळावे आणि सभा संमेलनाकरीता फारसा वेळ दवडता कामा नये या दृष्टीनेही या उमेदवारांनी सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. दरम्यान, त्या त्या प्रभागांमुळे चारही गटातील उमेदवार हे एकत्रितपणे प्रचार करण्यात गुंतले आहेत. तर ऐनवेळी बंडखोरी केलेल्या उमेदवारांसमोर सुध्दा या अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत प्रचार तरी कसा करावा, असा प्रश्न उभा राहीला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis