
लातूर, 04 जानेवारी (हिं.स.)भाजपा सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराने लातूरची घडी विस्कटली आहे. ही विस्कटलेली घड़ी पुन्हा व्यवस्थित बसवण्यासाठी आत्मविश्वासाने, जिद्दिने आणि एकसंघपणे काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उत्तरली आहे, असे ठामपणाने माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगीतले.
लातूर शहर महानगरपलिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने वाडा हॉटेल येथे काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोईज शेख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश सचिव संतोष सूर्यवंशी, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सचिव मुफ्ती वसीम सय्यद, वंचित बहुजन महिला आघाडीच्या मंजूताई निवाळकर, वंचित बहूजन जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे आघाडीचे शहर सचिन गायकवाड, शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव यांच्यासह काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उपस्थित होते.
लातूर शहर महानगरपालिकेची तिसरी सार्वत्रिक निवडणुक होत आहे. पहिल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहूमत होते. दुसऱ्या
निवडणुकीत काँग्रेसला काठावर बहुमत मिळाले आणि आता तिसरी निवडणुक होत आहे. आठ वर्षांनंतर ही निवडणुक होत आहे. दरम्यान बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. दरम्यानच्या महायुतीच्या आणि प्रशासक राजमध्ये मनपात चाललेला भ्रष्टाचार, लालफितीत अडकलेला कारभार, नागरीकांची होत असलेली हेळसांड. एकंदरीत नागरीकांऐवजी कंत्राटदार केंद्रबिंदू झाला. कंत्राटदाराला केंद्रस्थानी ठेऊन महायुतीने कारभार केला हे सर्वांनी अनुभवले आहे, असे नमुद करुन माजी मंत्री, आमदार अमित देशमुख पुढे म्हणाले, या निवडणुकीत काँग्रेसचा मित्र कोण याची चर्चा झाली. महाविकास आघाडी व्हावी, असा प्रामाणिक प्रयत्न केला. चर्चा केली पण काही कारणाने महाविकास
आघाडी होऊ शकली नाही याचे मला दुःख आहे.
वंचित बहुजन आघाडीसोबत मैत्री व्हावी, अशी अनेक वर्षांपासून चर्चा सुरु होती. लातूरमध्ये महापालिकेच्यानिमित्ताने काँग्रेस वंचित बहुजन आघाडी एकत्र आले, असे नमुद करुन माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले, आकड्यापेक्षा विचाराला आम्ही महत्व दिले. दोन्ही पक्षाचा हेतु एक असल्यामुळे आघाडीसाठी फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची चर्चा सुरु होती. मुंबई, नांदेडमध्ये काँग्रेस-वंचितची आघाडी झाली. तीच शृंखला पुढे लातूरपर्यंत आली.
काँग्रेस-वंचितचे उमेदवार उच्च शिक्षित, निष्कलंक
काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीने जे उमेदवार दिले ते नवीन चेहरे, अनुभवी चेहरे दिले आहेत. हे उमेदवार उच्च शिक्षीत, निष्कलंक, सामान्य माणसांशी नाळ जुळलेले आहेत लातूरचे मतदार या उमेदवारांना आपला मतदानरुपी आशिर्वाद देऊन लातूरचं भवितव्य उज्ज्वल राखतील, अशी अपेक्षा माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली.
लातूरचा आत्मा काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आहे. वंचित बहूजन आघाडीचे ४० उमेदवार निवडणुक रिंगणार राहणार होते. २५ जणांनी माघार घेतली. काँग्रेसमध्येही इच्छुकांची मोठी संख्या होती. वंचित बहूजन आघडीच्या पाच उमेदवरांसाठी काँग्रेसच्या इच्छुकांनीही त्याग केला. ही आघाडी होताना वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसपेक्षा अधिक त्याग केला. एका उदात हेतूसाठी अनेकांनी वैयक्तिक आकांक्षा बाजूला सारून माघार घेतली. ज्यांनी ज्यांनी माधार घेतली त्यांची क्षमा मागतो आणि आभारही मानतो, असे माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले.
महापालिकेची निवडणुक ही लातूरला पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत, असे नमुद करुन माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले, विकासरत्न विलासराव देशमुख यांनी धनेगाव येथील मांजरा धरणापासून लातूरपर्यंत पाणी पुरवठा योजना मंजूर केली. ती पूर्णत्वास आणली. त्यामुळेच लातूर शहराला चार-आठ दिवसाला का होईना पाणी मिळत आहे. काँग्रेसकडे जेव्हा संधी होती तेव्हा काँग्रेसने काय केले हे आम्ही सांगीतले. भाजपाकडे संधी होती तेव्हा त्यांनी काय केले हे आता सांगावे. भाजपा सत्ताधाऱ्यांना
शहरातील मलनिस्सारनचा प्रकल्प पूर्ण करता आला नाही. बंद पडलेले पथदिवे चालू करता आले नाहीत. कचरा व्यवस्थापनात खुप काम करण्याची आवश्यकता होतो. वाहतूक, आरोग्य, पर्यावरण, कायदा सुव्यवस्था, वाढते अपघात, दप्तर दिरंगाईमुळे कामे होत नाहीत. बांधकाम परवाने, नाहरकत मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतात. बाळ जन्मला येण्यासाठी जेवढा खर्च लागतो त्यापेक्षा अधिक खर्च जन्म दाखल काढण्यासाठी लागतो.
काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीने दिलेले उमेदवार कामाची माणसं आहेत. कॉंग्रेसच्या मतांचे विभाजन करण्याचा दृष्टीकोन भाजपा सत्ताधाऱ्यांचा होता. जे थांबणारच नव्हते त्यांच्यासाठी वेळ वाया का घालवायचा. ज्यांनी विचाराची फारकत घेतली त्यांच्याशी विचारविनिमय काय करायचा. आम्ही वैचारिक लढाई लढतो. लातूरकरांच्या प्रश्नांसाठी गांभीयनि, तत्परतेने पुढाकार घेतला आहे. जे करायचे ते प्रामाणिकपणे करायचे ही शिकवण विकासरत्न विलासराव देशमुख यांनी आम्हाला दिली. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, मंजुताई निंबाळकर, मुफ्ती वसीम सय्यद, सचिन गायकवाड यांनी ही पत्रकांराशी संवाद साधला
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis