
अमरावती, 04 जानेवारी (हिं.स.) | राज्य परिवहन महामंडळाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी राज्य शासनाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान राबविले होते. या अभियानाचा मुख्य उद्देश लोकसहभागातून विकास साधणे हा असून, त्याअंतर्गत प्रायोजकांच्या माध्यमातून विविध कामे करण्यात आली. याच धर्तीवर जिल्ह्यातील विविध एसटी आगारांत नव्याने दाखल झालेल्या ‘लालपरी’ तसेच ई-शिवाई बसगाड्यांचे मार्गफलक सध्या विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
नवीन फलकांमुळे प्रवाशांची, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय मोठ्या प्रमाणात टळली आहे. लांब पल्ल्याच्या तसेच मध्यम पल्ल्याच्या मार्गांवर धावणाऱ्या लालपरी आणि ई-शिवाई बसगाड्यांचे फलक आता अधिक स्पष्ट, ठळक व वाचनीय झाले आहेत.एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ई-बसगाड्यांवर डिजिटल मार्गफलक बसविण्यात आले आहेत. या फलकांवर स्क्रोल होणारी माहिती असून, पुढील व मागील बाजूस हे फलक बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हे फलक लांबूनही सहज दिसतील, अशा प्रकारचे असल्याने प्रवाशांना योग्य गाडी ओळखणे सुलभ झाले आहे.
मात्र, ग्रामीण भागातील एसटी फेऱ्यांची स्थिती अद्यापही काहीशी विचित्रच आहे. अनेक वर्षांपासून ग्रामीण मार्गांवरील गावनिहाय फलक तयार करण्यात आले नव्हते. परिणामी, अनेक ठिकाणी फलक जीर्ण अवस्थेत होते किंवा पूर्णपणे भंगार झाले होते. आर्थिक तरतुदीअभावी अनेक आगारांत ‘आहे त्यातच काम करा’ अशा तोंडी सूचनांवर चालक-वाहकांना काम करावे लागत होते. यामुळे जुने, वाकडे-तिकडे झालेले, तुटके-फुटके फलक वापरण्याची वेळ येत असे. काही ठिकाणी तर काचेवर खडू भिजवून किंवा चुन्याने बस कोठे जाणार आहे, हे लिहिले जात असे. आजही काही आगारांत जादा गाड्यांसाठी किंवा ग्रामीण फेऱ्यांकरिता हा प्रकार दिसून येतो; मात्र त्याचे प्रमाण आता कमी झाले आहे.
नव्या फलकांमुळे एसटीच्या प्रतिमेत सकारात्मक बदल होत असला तरी ग्रामीण मार्गांवरील फेऱ्यांमध्ये ही सुधारणा केव्हा पूर्णपणे अमलात येणार, हा प्रश्न अद्यापही कायम आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी