
पुणे, 04 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील एकल मातांच्या मुलांना शिक्षणासाठी सुविधा देण्याच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रथमच एकल मातांच्या मुलांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. त्यानुसार राज्यात एकल मातांची एकूण 2 लाख 23 हजार 42 मुले पहिली ते बारावी या इयत्तांमध्ये शिकत आहेत. त्यात सर्वाधिक 14 हजार 367 मुले नाशिक जिल्ह्यातील, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात सर्वांत कमी 1 हजार 8 मुले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
राज्यातील एकल मातांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती दयनीय आहे. एकल मातांच्या मुला-मुलींचे शिक्षण करणे त्यांना खूप कठीण जाते. त्यामुळे अनेकदा या महिला त्यांच्या मुला-मुलींना शाळेतून काढतात. त्यामुळे एकल मातांच्या मुला-मुलींची संख्या संकलित करून त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, एकल मातांच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या मुला-मुलींची संख्या संकलित करून शासनाला सादर करायची असल्याने एकल मातांच्या मुलांचे सर्वेक्षण करून जिल्हानिहाय आकडेवारी सादर करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, महापालिका-नगरपालिकांचे प्रशासन अधिकारी यांना परिपत्रकाद्वारे दिल्या होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु