आंध्र प्रदेशात टाटा पॉवर उभारणार ट सौर इनगॉट आणि वेफर उत्पादन प्रकल्प
अमरावती, 07 जानेवारी (हिं.स.) – टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जीने भारताच्या सौर ऊर्जा क्षेत्रात मोठी पायरी उचलत आंध्र प्रदेशातील नेल्लोरमध्ये 10 गीगावॉट क्षमतेचा इनगॉट आणि वेफर उत्पादन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. हा प्रकल्प देशातील अशा प्रकारचा स
Tata Power


अमरावती, 07 जानेवारी (हिं.स.) – टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जीने भारताच्या सौर ऊर्जा क्षेत्रात मोठी पायरी उचलत आंध्र प्रदेशातील नेल्लोरमध्ये 10 गीगावॉट क्षमतेचा इनगॉट आणि वेफर उत्पादन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. हा प्रकल्प देशातील अशा प्रकारचा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार असून, यासाठी तब्बल 6,675 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

सौर सेल आणि मॉड्यूल निर्मितीसाठी इनगॉट आणि वेफर अत्यंत महत्त्वाचे घटक असल्याने, भारताची चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा प्रकल्प निर्णायक पाऊल मानला जात आहे.

‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत उभारला जाणारा हा प्रकल्प देशाला सौर उपकरणांच्या उत्पादनात अधिक स्वावलंबी बनवेल.

मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखालील स्टेट इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, इफको किसान सेझमधील 200 एकर जागेतून 120 एकरवर कारखाना उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 1,000 तरुणांना थेट रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

सरकारकडून स्वतंत्र 200 मेगावॉट सौर प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून, या युनिटसाठी लागणारी वीज सौर ऊर्जेतूनच मिळेल. सुरुवातीला हा प्रकल्प ओडिशात उभारण्याचा विचार होता, परंतु जमिनीची उपलब्धता आणि कृष्णपट्टणम बंदराचे सान्निध्य यामुळे गुंतवणूक आंध्र प्रदेशाकडे वळली. नेल्लोर सौर उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित होत असून, येथे अनेक इतर मोठे प्रकल्पही उभे राहिले आहेत.

माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री नारा लोकेश म्हणाले, “टाटा समूहाकडून आणखी एका महत्त्वपूर्ण गुंतवणुकीचे यजमानपद भूषवताना आंध्र प्रदेशला अभिमान वाटतो. हा प्रकल्प राज्याच्या धोरणात्मक स्थिरता, पायाभूत सुविधांची सज्जता आणि स्वच्छ ऊर्जा उत्पादनासाठी असलेल्या वचनबद्धतेवर विश्वास दर्शवतो. यामुळे उच्च-गुणवत्तेच्या रोजगारांची निर्मिती होईल, आमच्या सौर उत्पादन परिसंस्थेला बळकटी मिळेल आणि भारताच्या ऊर्जा संक्रमणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान मिळेल.”

हा प्रकल्प TPREL च्या व्यापक नवीकरणीय ऊर्जा विस्तार योजनेंतर्गत आंध्र प्रदेशमधील पहिली उत्पादन गुंतवणूक ठरणार आहे. राज्य सरकार जलद मंजुरी, 'प्लग-अँड-प्ले' पायाभूत सुविधा आणि उद्योग-पूरक धोरणात्मक चौकटीद्वारे जागतिक दर्जाच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहे, ज्यामुळे राज्य भारताच्या नवीकरणीय ऊर्जा आणि प्रगत उत्पादन प्रवासात आघाडीवर राहील, असे लोकेश म्हणाले.

गेल्या वर्षी 7 मार्च 2025 रोजी टाटा पॉवर आणि आंध्र प्रदेश सरकारदरम्यान 49,000 कोटी रुपयांच्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी झालेल्या करारांतर्गत हा पहिला मोठा उत्पादन प्रकल्प असून, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील यशस्वी सौर प्रकल्पांनंतर टाटाची ही आणखी एक महत्वाची कामगिरी मानली जात आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande