मुंबईत एकनाथ शिंदे-संजय राऊत अचानक समोरासमोर, भेटीतील हस्तांदोलनाची सर्वत्र चर्चा
मुंबई, 08 जानेवारी (हिं.स.) - युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं, असं म्हणतात. तसंच राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. याची प्रचिती आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना (उबाठा) प्रवक्ता खासदार संजय राऊत यांच्या समोरासमोर भ
एकनाथ शिंदे संजय राऊत


मुंबई, 08 जानेवारी (हिं.स.) - युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं, असं म्हणतात. तसंच राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. याची प्रचिती आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना (उबाठा) प्रवक्ता खासदार संजय राऊत यांच्या समोरासमोर भेटीने आली. मुंबईत एका हिंदी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीसाठी दोन्ही नेते आले होते. यावेळी एकनाथ शिंदे हे त्यांची मुलाखत आटोपून बाहेर पडत होते. यानंतर लगेचच संजय राऊत यांची मुलाखत होती. त्यासाठी ते स्टुडिओच्या दिशेने जात होते. त्यावेळी समोरुन एकनाथ शिंदे हेदेखील येत होते. हे दोन्ही नेते एकमेकांसमोर आल्यानंतर त्यांनी एकमेकांकडे पाहून अभिवादन केले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आला असताना शिंदे-राऊत यांची भेटीची महत्त्वाची राजकीय घडामोडी घडली. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची चौकशी केली. यानंतर एक-दोन मिनिटं जुजबी गप्पा मारुन हे दोन्ही नेते आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले. ही औपचारिक भेट ठरली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी फार वार्तालाप केला नाही. पण दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. त्यामुळे राजकारणातील हे एक सुखद चित्र म्हणावे लागेल. पण या भेटीची समाजमाध्यमांसह सर्वत्र चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेना पक्ष फुटला होता. यानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळाल्याने तो पक्ष अधिकृत शिवसेना ठरला होता. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात प्रचंड वितुष्ट आले आहे. मुंबई महानगपालिका निवडणुकीचा प्रचार सुरु झाल्यापासून ठाकरे कुटुंबीय सातत्याने एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आहेत. संजय राऊतही त्यांच्या पत्रकार परिषदेत सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर आगपाखड करत असतात. मात्र, आज हे राजकीय मतभेद बाजुला सारुन या दोन्ही नेत्यांनी सुसंस्कृतपणे एकमेकांशी गप्पा मारल्या. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande