
नवी दिल्ली , 07 जानेवारी (हिं.स.)। अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसंदर्भात अमेरिकन दूतावासाने बुधवारी एक इशारा जारी केला आहे. कोणत्याही प्रकारचे नियम उल्लंघन केल्यास विद्यार्थ्यांना देशाबाहेर हाकलले जाऊ शकते, असे दूतावासाने स्पष्ट केले आहे. अमेरिकन दूतावासाने ठामपणे सांगितले की अमेरिकन व्हिसा हा अधिकार नसून एक विशेष सवलत आहे आणि अमेरिकेत वास्तव्यास असताना कायदे मोडल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे की, अमेरिकन कायदे मोडल्यास तुमच्या विद्यार्थी व्हिसावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तुम्हाला अटक झाली किंवा कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केल्यास तुमचा व्हिसा रद्द केला जाऊ शकतो, तुम्हाला देशाबाहेर पाठवले (डिपोर्ट) जाऊ शकते आणि भविष्यात अमेरिकन व्हिसा मिळण्यावर बंदी येऊ शकते. नियमांचे पालन करा आणि तुमचा प्रवास धोक्यात घालू नका. अमेरिकन व्हिसा ही एक सवलत आहे, अधिकार नाही.
हा इशारा अशा वेळी देण्यात आला आहे, जेव्हा काही महिन्यांपूर्वी ट्रम्प प्रशासनाने विद्यार्थी व्हिसा प्रक्रियेत मोठे बदल जाहीर केले होते. या बदलांमध्ये अधिक शुल्क, सोशल मीडियाची सक्तीची तपासणी आणि विद्यार्थ्यांच्या अमेरिकेत राहण्याच्या कालावधीवर प्रस्तावित मर्यादा यांचा समावेश आहे. या बदलांचा थेट परिणाम अमेरिकेत शिक्षण घेण्याची योजना करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांवर होण्याची शक्यता आहे.
या बदलांच्या केंद्रस्थानी ‘वन बिग ब्यूटीफुल बिल’ आहे, ज्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ जुलै २०२५ रोजी स्वाक्षरी केली होती. या विधेयकाअंतर्गत २५० अमेरिकी डॉलर (सुमारे २१,४६३ रुपये) इतके ‘व्हिसा अखंडता शुल्क’ तसेच फॉर्म I-94 साठी २४ डॉलर (सुमारे २,०६० रुपये) इतके सक्तीचे शुल्क आकारण्यात आले आहे. फॉर्म I-94 हा परदेशी नागरिकांच्या आगमन आणि निर्गमनाशी संबंधित एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode