
मुंबई, 07 जानेवारी (हिं.स.)। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. राज्य निवडणूक आयोगाने भाजपने तयार केलेल्या विशेष प्रचार गीताला परवानगी नाकारली असून आचारसंहितेचा भंग झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे.
राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर प्रचाराला जोर आलेला आहे. मतदानाला अवघे सात दिवस शिल्लक असताना सर्वच पक्षांनी प्रचारसभांमधून आणि डिजिटल माध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशातच मुंबई महापालिकेसाठी भाजपने तयार केलेल्या प्रचार गीतावर आयोगाने हरकती घेतल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या गीतात “भगवा” या शब्दाचा वापर करण्यात आला होता. धार्मिक भावना आणि विशिष्ट प्रतीकांचा राजकीय प्रचारात वापर टाळण्याबाबत आचारसंहितेत स्पष्ट तरतुदी असल्याने हा शब्दप्रयोग नियमांना विरोधात असल्याचे आयोगाने नमूद केले आहे. त्यामुळे हे गीत अधिकृत प्रचारासाठी वापरू नये, असा स्पष्ट नकार देण्यात आला आहे.
उल्लेखनीय म्हणजे हे गीत मोठ्या स्वरूपात तयार करण्यात आले होते आणि प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते व गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले होते. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात या गीताच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची भाजपची योजना होती. पण आयोगाच्या निर्णयामुळे पक्षाच्या या रणनीतीला धक्का बसला आहे. आता भाजप यावर कोणती भूमिका घेणार, गीतात बदल करून पुन्हा परवानगी मागितली जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडीतून आचारसंहितेची अंमलबजावणी निवडणूक आयोग किती कडकपणे करीत आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule