
नांदेड, 8 जानेवारी, (हिं.स.)। महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात वनविभागाने अवैध लाकूड तस्करीविरुद्ध धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. चिखली बीटमधील कक्ष क्रमांक २०० मध्ये सागाच्या लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या २० ते २३ तस्करांचा प्रयत्न वनविभागाच्या सतर्कतेमुळे उधळून लावला असून, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात सागाचे 'कट साईज' नग जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक किरण चव्हाण आणि वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एल. राठोड यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सीमाभागात वाढती तस्करी लक्षात घेता वनविभागाने आपली गस्त अधिक तीव्र केली आहे.
या मोहिमेत महाराष्ट्र आणि तेलंगणा अशा दोन्ही राज्यांतील वन कर्मचाऱ्यांनी समन्वय साधला. यामध्ये वन अधिकारी चिखली वनपरिमंडळ अधिकारी बी. टी. जाधव, एच. बी. चौधरी, वनरक्षक व्ही. एस. मुळे, टी. आर. घोडके (चिखली) आणि ईचोडा (तेलंगणा) येथील वनरक्षक ईश्वर पवार. वनमजूर तुळशीराम सीडाम, एल. पी. शिंदे, राजूरबडे, जंगा सिडाम, वाहनचालक बाळकृष्ण आवले यांचा समावेश आहे. तसेच पुढील तपास सुरू असून घटनास्थळावरून जप्त केलेला सागाचा माल वनविभागाच्या ताब्यात असून त्याची मोजणी आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. पळून गेलेल्या तस्करांचा शोध घेण्यासाठी परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे. वनविभागाच्या या धाडसी कारवाईमुळे लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
चिखली वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र चिखली बीटमध्ये वनविभागाचे पथक पायी गस्त घालत होते. कक्ष क्रमांक २०० आणि सर्वे नंबर ५० च्या परिसरात पथक पोहोचले असता, तेलंगणा सीमाभागातून २० ते २३ व्यक्ती डोक्यावरून सागाच्या लाकडाची वाहतूक करताना आढळून आले. वन कर्मचाऱ्यांनी त्यांना घेराव घालून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, वनविभागाची चाहुल लागताच तस्करांनी जवळील सागी लाकडाचे अवैध कट साईज नग जागेवरच सोडून घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis