
नांदेड, 08 जानेवारी (हिं.स.)।हदगाव तालुक्यातील बामणी फाटा परिसरातील गूळ कारखान्यावर कामासाठी आलेला मजूर बेपत्ता होता. त्याचा शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह परिसरातील एका नाल्यात आढळून आला. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील मूळ रहिवासी असलेला प्रवेश सुरेश कुमार २२ हा तरुण हदगाव तालुक्यातील मौजे बामणी फाटा येथील एका गूळ कारखान्यावर कामासाठी आला होता. या तरुणाने दीड महिने काम केले. या काळात त्याने सुटी घेतली नव्हती. बाजारात जातो असे सांगून त्याने सुटी घेवून बाजारासाठी गेला. परंतु तो घरी परतलाच नाही. गूळ कारखान्यातील कर्मचारी व मालकाने त्याचा परिसरात शोध घेतला मात्र तो काही आढळून आला नाही. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या मूळगावी फोन करुन माहिती घेतली पण तो तिकडेही आला नसल्याचे सांगण्यात आले. बामणी परिसरातील शेतकऱ्याच्या शेतात हरभऱ्याची फवारणी चालू असताना अचानक फवारणी करणाऱ्याची नजर नाल्याकडे गेली असता त्या नाल्यामध्ये मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ बामणीचे सरपंच, पोलीस पाटील यांना माहिती दिली. पोलीस पाटलांनी तात्काळ मनाठा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. मनाठा पोलीस ठाण्याचे सपोनि विलास चवळी यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार अशोक दाढे, बोराटे, खनपटे, नरवाडे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन हा कामगार बामणी फाटा येथील गुळ कारखान्यावरील काम करणार असल्याचे समजले. पोलिसांनी गुळ कारखान्यावर पूर्ण चौकशी करून त्यांचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणला. वैद्यकीय अधिकारी डॉ. भिसे व सहकाऱ्यांनी शवविच्छेदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis