भारत आणि ब्राझील यांनी टीकेडीएल ऍक्सेस करारावर केली स्वाक्षरी
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। ब्राझीलची राष्ट्रीय औद्योगिक मालमत्ता संस्था (आयएनपीआय) आणि भारतातील वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) यांच्यात पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी (टीकेडीएल) या भारतीय पारंपरिक ज्ञानाच्या अद्वितीय ‘पूर्व-प
India Brazil sign TKDL access agreement


नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। ब्राझीलची राष्ट्रीय औद्योगिक मालमत्ता संस्था (आयएनपीआय) आणि भारतातील वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) यांच्यात पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी (टीकेडीएल) या भारतीय पारंपरिक ज्ञानाच्या अद्वितीय ‘पूर्व-प्रकाशित माहिती’ (प्रायर-आर्ट) डेटाबेसमध्ये प्रवेशाबाबत सहकार्य करार करण्यात आला आहे. हा करार 21 फेब्रुवारी 2026 रोजी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा हे 18 ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’मध्ये सहभागी होण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चेसाठी भारताच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. आयएनपीआय, ब्राझील आणि सीएसआयआर, भारत यांच्यात झालेल्या टीकेडीएल प्रवेश कराराच्या देवाणघेवाणीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. या करारामुळे पारंपरिक ज्ञान आणि बौद्धिक संपदा हक्क क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ होणार आहे.

या सहकार्याअंतर्गत ब्राझीलच्या पेटंट कार्यालयास पेटंट परीक्षण आणि मंजुरी प्रक्रियेदरम्यान टीकेडीएल डेटाबेसमध्ये प्रवेश मिळणार आहे. भारतीय पारंपरिक ज्ञानाचे चुकीचे पेटंटिंग किंवा गैरवापर टाळण्यासाठी टीकेडीएल ही एक प्रभावी यंत्रणा म्हणून कार्य करते.

आयएनपीआय, ब्राझील यांच्यासोबत झालेल्या टीकेडीएल प्रवेश करारामुळे भारताच्या जैवचोरी (बायोपायरेसी) व पारंपरिक ज्ञानाच्या गैरवापरास प्रतिबंध करण्याच्या जागतिक प्रयत्नांना नवे बळ मिळणार आहे. तसेच नवकल्पना आणि पूर्व-प्रकाशित माहितीचे अधिक अचूक मूल्यमापन सुलभ करून ब्राझीलच्या पेटंट परीक्षण प्रक्रियेची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढविण्यासही या करारामुळे मदत होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande