एकता आणि विश्वासाच्या माध्यमातून भारतात सुवर्णयुग अवतरेल - राष्ट्रपती
· ब्रह्मकुमारीजच्या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ नागपूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.) : महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. या राज्याने देशाला दिशा दिली. याच भूमीत नकारात्मक विचार त्यागून सकारात्मकतेची कास धरत आंतरिक शांती, परस्पर सौहार्दतेतून ब
राष्ट्रपती


राष्ट्रपती


· ब्रह्मकुमारीजच्या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ

नागपूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.) : महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. या राज्याने देशाला दिशा दिली. याच भूमीत नकारात्मक विचार त्यागून सकारात्मकतेची कास धरत आंतरिक शांती, परस्पर सौहार्दतेतून ब्रह्मकुमारीजच्या एकता आणि विश्वासाची मोहीम प्रभावीपणे कार्य करेल व महाराष्ट्रासह देशात सुवर्णयुग अवतरेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे व्यक्त केला.

एकमेकांप्रती विश्वास-सौहार्दता-एकता आणि मानवतेच्या मूल्यांची जपणूक अधिक वृद्धिंगत व्हावी, यासाठी ‘एकता व विश्वासाने महाराष्ट्राचे स्वर्णयुग’ या ब्रह्मकुमारीजच्या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जामठातील विश्वशांती सरोवर येथे झाला. त्यावेळी राष्ट्रपती बोलत होत्या. राज्यपाल आचार्य देवव्रत, महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माऊंटआबू येथील ब्रह्माकुमारीजचे अतिरिक्त महासचिव बी. के. मृत्युंजय भाई, राजयोगिनी बी. के. चंद्रिका दीदी, ब्रह्मकुमारीज नागपूरच्या प्रमुख राजयोगिनी बी. के. रजनी दीदी आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, महाराष्ट्राच्या भूमीतील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी महान रत्नांनी देश व जगाला सामाजिक समरसता व राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही राज्याने देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. याच महाराष्ट्रात ब्रह्मकुमारीजच्या एकता व विश्वास आधारित राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ होत आहे. यातून आत्मशांती, परस्पर सौहार्द, सकारात्मक विचार आदी जीवनमूल्यांचा समाजात प्रसार होऊन समृद्ध राज्य घडण्यासाठी प्रेरणा मिळेल. हाच मार्ग पुढे देशभर प्रशस्त होऊन परस्परातील भेदभाव सोडून करुणा, परस्पर प्रेम व समन्वयातून विकसित भारतासाठी सर्व जनता एकतेच्या धाग्यात गुंफली जाईल,असे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.

देशात सामाजिक समरसतेचा भाव वृद्धिंगत करण्याकरिता केंद्र शासन एक भारत श्रेष्ठ भारत हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवित आहे. राज्या- राज्यांमधील सांस्कृतिक, सामाजिक मूल्यांचे आदान- प्रदान होऊन विकसित भारताच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत डिजिटल इंडिया कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्याचे सकारात्मक परिणाम सर्वत्र दिसत आहेत. देशात पायाभूत सुविधांचे जाळेही निर्माण होत आहे. केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीतून सर्वसामान्य जनतेमध्ये विकसित भारत घडविण्याचा विश्वास निर्माण होत असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी नमूद केले.

ब्रह्मकुमारीजच्या एकता व विश्वास मोहिमेमुळे राज्य व केंद्राच्या विकसित भारत बनण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना अधिक बळ मिळेल. सर्वांना विकासाची समान संधी मिळेल. सकारात्मकता अंगीकारुन सर्वच क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व प्रामाणिक प्रयत्नांसाठी परस्पर विश्वासाद्वारे जनता एकजुटीने कार्य करेल व देशात सुवर्ण युग अवतरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रगतीसाठी एकता आणि विश्वास मोलाचा - राज्यपाल आचार्य देवव्रत

ज्या भूमीत एकता आणि विश्वास आहे, त्याची प्रगती कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. विश्वास आणि एकता हे एकमेकांना पूरक शब्द असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले की, ब्रह्मकुमारीजचे कार्य संपूर्ण विश्वाला प्रेरणा देणारे आहे. एकता हाच शांतीचा मंत्र आहे आणि विश्वास असेल तरच एकता निर्माण होते. वेद हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे. प्रेमामुळेच जगात शांती व समृद्धी नांदू शकते, हा वेदाचा मंत्र असल्याचेही राज्यपालांनी सांगितले.

जागृत समाजामुळेच कल्याणकारी कार्यक्रमांना बळ – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

ब्रम्हकुमारीजचा नागपुरातील विश्वशांती सरोवर परिसर हा अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे कार्य करीत असून ही प्रेरणादायी भूमी असल्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. जागृत समाज हा शासनाच्या विविध कल्याणकारी कार्यक्रमांना बळ देतो. हाच संदेश पुढे नेत एकता व विश्वासावर आधारित ब्रह्मकुमारीजचे अभियान हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक प्रगतीच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. मानवतेला पुढे नेणारा हा उपक्रम विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीत योगदान देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी, ब्रह्मुकुमारी सेवकांना कलश व ध्वज प्रदान करून राष्ट्रपतींनी मोहिमेचा शुभारंभ केला.

ब्रह्मकुमारीज नागपूरच्या प्रमुख राजयोगिनी बी.के. रजनी दीदी यांचे स्वागतपर भाषण झाले. ब्रह्मकुमारीजचे अतिरिक्त महासचिव बी.के. मृत्युंजय भाई यांनी ब्रह्मकुमारीजच्या वतीने महाराष्ट्रात सुरू होत असलेल्या मोहिमेविषयी माहिती दिली.राजयोगिनी बी.के.चंद्रिका दीदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या राज्यव्यापी मोहिमेसाठी ब्रह्माकुमारीजमार्फत आठ सिद्धांत निश्चित करण्यात आले आहेत. यात व्यसनमुक्त समाजाची निर्मिती, शाश्वत जीवन पद्धती, स्वच्छता व नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीत कर्तव्याचे भान, मानवतेसाठी कर्तव्यतत्परता, मूल्याधारित शिक्षण, निर्मळ व संयमी जीवन-योगा, हरित व शाश्वत महाराष्ट्र, सुसंवादातून आनंदी जीवन यावर भर दिला आहे. या सिद्धांतातूनच महाराष्ट्रात स्वर्णिम युगाचा प्रत्यय अधिक बळकट होणार असून राज्यातील प्रत्येक तालुका पातळीवरील ब्रह्मकुमारीजच्या केंद्रांमार्फत ही मोहीम प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande