
मुंबई, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। कुपोषणमुक्त, निरोगी आणि सक्षम गावांच्या निर्मितीसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘सुपोषित ग्रामपंचायत अभियान’ अंतर्गत महाराष्ट्राने देशपातळीवर उल्लेखनीय यश संपादन केले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
‘सुपोषित ग्रामपंचायत अभियान’ ही कुपोषणमुक्त, निरोगी आणि सक्षम गाव निर्माण करण्यासाठी राबवली जाणारी उपक्रमात्मक मोहीम आहे. या अभियानाचा उद्देश ग्रामपंचायत स्तरावर पोषणविषयक नियोजन, अंमलबजावणी आणि जनजागृती अधिक प्रभावी करणे हा आहे. देशातील 1000 ग्रामपंचायतीमध्ये राज्यातील १९२ ग्रामपंचायती अव्वल ठरत ‘सुपोषित ग्रामपंचायत अभियान’ अंतर्गत राज्याने पहिला क्रमांक पटकावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत हे यश संपादित केले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या यशात राज्याच्या सर्वांगीण प्रयत्नांचे प्रतिबिंब दिसून येत असून हे भव्य यश महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी ठरले आहे. हे यश माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना समर्पित करत असल्याच्या भावनाही मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केल्या.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे समर्पण, महिला व बालविकास विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांची उल्लेखनीय कामगिरी असल्याचे सांगत त्यांचे मंत्री आदिती तटकरे यांनी अभिनंदन केले.
‘सुपोषित ग्रामपंचायत अभियाना’चे बालक, किशोरवयीन मुली, गर्भवती व स्तनदा माता यांच्यातील कुपोषण कमी करणे हे उद्दीष्ट आहे. संतुलित आहार, स्वच्छता, आरोग्य आणि लसीकरणाबाबत जागरूकता वाढवणे. ग्रामपंचायतींनी पोषणविषयक कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी या अभियानाअंतर्गत करण्यात येते.
तसेच, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांचा समन्वय साधणे. स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक मंडळे आणि नागरिकांचा सहभाग वाढविणे. अंगणवाडी केंद्रे, आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून नियमित वाढ मापन, पोषण ट्रॅकिंग व डेटा व्यवस्थापन, किचन गार्डन (पोषण बाग) प्रोत्साहन, विशेष पोषण सप्ताह, जनजागृती मोहीमा आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. हे अभियान केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पोषण अभियान या उपक्रमाशी संलग्न आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर