लखनऊ येथे डबल डेकर बस उलटून 5 जणांचा मृत्यू, 16 जखमी
लखनऊ, 23 फेब्रुवारी (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या लखनऊ येथे पूर्वांचल एक्स्प्रेस-वे वर आज, सोमवारी दुपारी एका डबल डेकर बसला मोठा अपघात झाला. ही बस पंजाबच्या लुधियानाहून बिहारच्या दरभंगा येथे चालली होती. या अपघातात 5 जण मृत्यूमुखी पडले असून 16 जण जखमी
लखनऊ येथे डबल डेकर बस उलटून अपघात


लखनऊ, 23 फेब्रुवारी (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या लखनऊ येथे पूर्वांचल एक्स्प्रेस-वे वर आज, सोमवारी दुपारी एका डबल डेकर बसला मोठा अपघात झाला. ही बस पंजाबच्या लुधियानाहून बिहारच्या दरभंगा येथे चालली होती. या अपघातात 5 जण मृत्यूमुखी पडले असून 16 जण जखमी झाले आहेत.

लखनऊच्या गोसाईगंज परिसरातील खेमा खेड़ा गावाजवळ बस वेगामुळे नियंत्रणाबाहेर जाऊन उलटल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांच्या मते, चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात झाला असावा. प्रवाशांनी आणि नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या गोसाईगंज पोलिसांनी रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना स्थानिक सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. बचाव आणि मदतकार्य सुरू असून पोलिस उपायुक्त (दक्षिण) निपुण अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात एक महिला, एक पुरुष आणि तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.

गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इंन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीजीआय) आणि किंग जॉर्ज मेडीकल युनिर्व्हसिटी (केजीएमयू) येथे दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी विशाख तसेच पोलिस आयुक्त अमरेंद्र सेंगर यांनी गोसाईगंज सामुदायिक आरोग्य केंद्रात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. प्रशासन आणि पोलिस पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande