
रांची, 24 फेब्रुवारी (हिं.स.) : झारखंडची राजधानी रांची येथून दिल्लीकडे निघालेली एअर ऍम्ब्युलन्स कोसळून झालेल्या भीषण अपघाताला 7 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघातग्रस्त विमान झारखंडच्या चतरा जिल्हातील सिमरिया जंगल परिसरात कोसळले. विमानात रुग्णासह एकूण 7 जण प्रवास करत होते आणि या दुर्घटनेत सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती चतरा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुमित अग्रवाल यांनी दिली.
या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये रुग्ण संजय कुमार (40), त्यांची पत्नी अर्चना देवी (35), भाचा ध्रुव कुमार , डॉक्टर डॉ. विकास कुमार गुप्ता, पॅरामेडिकल कर्मचारी सचिन कुमार मिश्रा, वैमानिक विवेक विकास भगत आणि सहवैमानिक सौराजदीप सिंह यांचा समावेश आहे. संजय कुमार काही दिवसांपूर्वी एका ढाब्यात लागलेल्या भीषण आगीत गंभीररीत्या भाजले होते. इलेक्ट्रिक बर्नमुळे त्यांच्या शरीराचा सुमारे 65 टक्के भाग भाजला होता. त्यांना रांचीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि मागील 10 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना अधिक चांगल्या उपचारांसाठी दिल्लीला नेण्याचा निर्णय घेतला होता. संजय कुमार व्यवसायाने ढाबा चालवत होते आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांची गंभीर अवस्था पाहता आर्थिक अडचणींकडे दुर्लक्ष करून कुटुंबीयांनी एअर ऍम्ब्युलन्सची व्यवस्था केली. नातेवाईक आणि परिचितांनीही सहकार्य केले, जेणेकरून त्यांना दिल्लीतील मोठ्या रुग्णालयात दाखल करता येईल. एअर ऍम्ब्युलन्सची व्यवस्था झाल्यानंतर कुटुंबामध्ये आशेचा किरण निर्माण झाला होता.
संजय यांना एअर ऍम्ब्युलन्समध्ये हलविण्यात आले. त्यांच्या सोबत पत्नी आणि इतर नातेवाईकही होते. सर्वांच्या मनात आशा आणि प्रार्थना होत्या; परंतु ही उड्डाणच त्यांच्या आयुष्यातील शेवटचे ठरले. विमानाने रांचीहून 7.15 वाजेच्या सुमाराला उड्डाण केले होते आणि रात्री सुमारे 10 वाजता दिल्लीला पोहोचण्याचा अंदाज होता. मात्र उड्डाणानंतर सुमारे अर्ध्या तासातच विमान अपघातग्रस्त झाले. विमानात एक रुग्ण, एक डॉक्टर, एक पॅरामेडिक, दोन सहाय्यक, एक वैमानिक आणि एक सहवैमानिक प्रवास करत होते.
वैमानिक विवेक विकास भगत आणि सहवैमानिक सौराजदीप सिंह अशी त्यांची नावे सांगण्यात आली आहेत. उड्डाणादरम्यान खराब हवामानामुळे विमानाने मार्ग बदलण्याची परवानगी मागितल्याची माहिती आहे. काही काळ विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क होता; मात्र नंतर अचानक संपर्क तुटला. विमानाचा संपर्क ना वाराणसी एटीसीशी झाला, ना लखनऊ एटीसीशी जोडता आला. शेवटचा संपर्क कोलकाता एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झाला होता. त्यानंतर कोणताही संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही आणि काही वेळातच विमान सिमरिया येथील जंगलात कोसळले.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी