
नाशिक, 24 फेब्रुवारी (हिं.स.) : लंडनहून हैदराबादला जाणारे ब्रिटिश एअरवेजचे विमान मंगळवारी पहाटे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अचानक उतरवण्यात आले. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे पायलटला आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु त्याच्या सतर्कतेमुळे विमानातील 169 प्रवाशांची सुरक्षित सुटका झाली.
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार, लंडनहून हैदराबादकडे निघालेल्या बोईंग 787 विमानात अचानक तांत्रिक समस्या निर्माण झाली. हैदराबादच्या खराब हवामानामुळे विमान थेट लँड करू शकले नाही. परिस्थिती गंभीर असल्याचे ओळखून पायलटाने विमान नागपूरच्या दिशेने वळवले आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) कडून आपत्कालीन लँडिंगची परवानगी घेतली. नागपूर एटीसीने परवानगी दिल्यानंतर विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरले. प्रशासनाने सर्व यंत्रणा हायअलर्टवर ठेवल्या होत्या. ही घटना मंगळवारी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास घडली. आपत्कालीन परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळल्यामुळे विमानातून खाली उतरल्यावर प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis