
आगामी 9 मार्चपासून अंतर्गत समन्वय बैठकांना प्रारंभ
नागपूर, 24 फेब्रुवारी (हि.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभा हरियाणातील समालखा येथे होणार आहे. संघाच्या प्रचार विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक 13 ते 15 मार्चदरम्यान होणार असून 9 मार्चपासून अंतर्गत समन्वय बैठका सुरू होतील. या बैठकीतील सर्व प्रमुख सत्रांना सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले तसेच सह-सरकार्यवाह उपस्थित राहणार आहेत.
विस्तार आणि कार्ययोजनेवर सखोल मंथन
प्रचार विभागाच्या माहितीनुसार, प्रतिनिधी सभेत 2025-26 या वर्षातील संघकार्याचा आढावा घेतला जाणार आहे. कार्यविस्तार, कार्यकर्ते घडविणे आणि प्रशिक्षणाची धोरणे यावर सविस्तर चर्चा होणार आहे. एप्रिल ते जूनदरम्यान होणाऱ्या संघ शिक्षावर्गांची रूपरेषा व परिणामकारकता यांचाही आढावा बैठकीच्या कार्यसूचीत समाविष्ट आहे. तसेच देशातील वर्तमान परिस्थितीवर विचारविनिमय करून काही ठराव संमत होण्याची शक्यता आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या देशव्यापी दौऱ्यादरम्यान मांडण्यात आलेल्या विविध विषयांवरही प्रतिनिधी सभेत चर्चा होणार आहे.
शताब्दी वर्ष आणि संघटनात्मक पुनर्रचनेवर विशेष भर
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभर राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेणे हा या बैठकीचा महत्त्वाचा भाग असेल. तसेच संघाच्या कार्यक्षेत्राच्या पुनर्रचनेला अंतिम स्वरूप देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. प्रस्तावित योजनेनुसार सर्व प्रांतांचे विभागांमध्ये विभाजन करून संघटनात्मक कार्य अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पुनर्रचनेला अंतिम मान्यता देऊन पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, ज्यायोगे नोव्हेंबरपासून प्रस्तावित जिल्हा संघचालकांच्या निवडणुका पूर्ण करून नव्या समित्यांची स्थापना करता येईल.
व्यापक प्रतिनिधित्व
अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत अखिल भारतीय पदाधिकारी, क्षेत्र संघचालक, प्रचारक, कार्यवाह, प्रांत संघचालक, विविध कार्यविभागांचे प्रमुख, निवडून आलेले प्रतिनिधी तसेच माजी पदाधिकारी सहभागी होणार आहेत. याशिवाय संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. यामध्ये विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, सेवा भारती, स्वदेशी जागरण मंच, विद्या भारती, राष्ट्र सेविका समिति आणि राष्ट्रीय शैक्षिक महासंघ यांसह इतर संघटनांचे अध्यक्ष व संघटनमंत्री सहभागी होणार आहेत.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे 8 मार्चपर्यंत समालखा येथे पोहोचतील. मुख्य बैठकीनंतर 17 मार्चपर्यंत सुरू राहणाऱ्या विविध अंतर्गत बैठकींमध्येही ते सहभागी होतील. संघटनात्मक दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून भविष्यातील धोरणात्मक निर्णय आणि रचनात्मक बदल यावर निर्णायक पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी