बारामती विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएची कारवाई; व्हीएसआर व्हेंचर्सच्या चार लिअरजेट विमानांवर बंदी
मुंबई, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. या दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयान
DGCA VSR Ventures four Learjet aircraft banned


मुंबई, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. या दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने संबंधित कंपनीविरोधात कठोर प्रशासकीय कारवाई करत विशेष सुरक्षा लेखापरीक्षणाच्या आधारे कंपनीची चार विमानं तत्काळ ग्राउंड करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे विमान सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बारामती येथे अपघातग्रस्त झालेलं Learjet 45 (VT-SSK) हे विमान M/s VSR Ventures Pvt. Ltd. या कंपनीच्या ताफ्यातील होतं. दुर्घटनेनंतर कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि देखभाल प्रक्रियेवर विविध स्तरांतून शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने कंपनीचा सखोल ‘स्पेशल सेफ्टी ऑडिट’ हाती घेतला. या बहुविभागीय तपासणीदरम्यान एअरवर्दिनेस, एअर सेफ्टी आणि फ्लाइट ऑपरेशन्ससारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये मंजूर प्रक्रियांतील अनेक त्रुटी तसेच नियमांचं उल्लंघन आढळून आल्याचं समोर आलं. विशेषतः देखभाल प्रक्रियेमध्ये गंभीर उणिवा असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.

या निष्कर्षांच्या आधारे कंपनीच्या Learjet 40/45 प्रकारातील VT-VRA, VT-VRS, VT-VRV आणि VT-TRI या नोंदणी क्रमांकांच्या विमानांना पुढील आदेशापर्यंत उड्डाणास मज्जाव करण्यात आला आहे. एअरवर्दिनेसची आवश्यक मानकं पूर्ण होईपर्यंत ही विमानं ग्राउंडच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. डीजीसीएच्या या निर्णयामुळे कंपनीच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

दरम्यान, दुर्घटनेनंतर कंपनीकडे आवश्यक परवानग्या आणि कागदपत्रांची पूर्तता नव्हती, असे आरोपही करण्यात आले होते. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी कंपनीच्या व्यवस्थापनावर आणि मालकांवर कठोर शब्दांत टीका करत सखोल चौकशीची मागणी केली होती. दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने कंपनीला आढळलेल्या त्रुटींवर ‘रूट कॉज अॅनालिसिस’ सादर करण्यासाठी डिफिशियन्सी रिपोर्टिंग फॉर्म जारी केले आहेत. कंपनीकडून प्राप्त होणाऱ्या स्पष्टीकरणाचं परीक्षण करून पुढील मूल्यांकनानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे खासगी चार्टर सेवा, विमान सुरक्षा आणि नियामक यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत व्यापक चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात आला होता. त्यांच्या अकाली जाण्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता डीजीसीएच्या कारवाईमुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक अधोरेखित झाली असून पुढील चौकशी आणि अंतिम अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande