डीजीसीएने नॉन-शेड्यूल्ड फ्लाइट ऑपरेटर्ससाठी नियम केले कडक
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। देशातील नॉन-शेड्यूल्ड ऑपरेटर म्हणजेच चार्टर्ड विमान आणि एअर ॲम्ब्युलन्स सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नियम अधिक कडक केले आहेत. अलीकडे घडलेल्या दोन गंभीर चार्टर्ड विमान अप
DGCA


नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। देशातील नॉन-शेड्यूल्ड ऑपरेटर म्हणजेच चार्टर्ड विमान आणि एअर ॲम्ब्युलन्स सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नियम अधिक कडक केले आहेत. अलीकडे घडलेल्या दोन गंभीर चार्टर्ड विमान अपघातांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आता अशा सर्व ऑपरेटर कंपन्यांना त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर संबंधित विमान किती जुने आहे, त्याचा संपूर्ण मेंटेनन्स किंवा देखभाल इतिहास काय आहे, पायलटचा अनुभव याची माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना आणि संबंधितांना विमानाच्या सुरक्षिततेबाबत अधिक पारदर्शक माहिती मिळणार आहे.

झारखंडमध्ये नुकत्याच झालेल्या एअर ॲम्ब्युलन्स अपघातानंतर डीजीसीएने सर्व नॉन-शेड्यूल्ड ऑपरेटर कंपन्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत सुरक्षा मानकांवर सविस्तर चर्चा झाली. ऑपरेटर कंपन्यांना त्यांच्या ‘सेफ्टी रेकॉर्ड’नुसार रँकिंग देण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. ही रँकिंग डीजीसीएच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार असून, ज्यामुळे प्रवाशांना सेवा निवडताना अधिक माहितीपूर्ण निर्णय घेता येईल. चुकीसाठी केवळ पायलटला जबाबदार धरण्याची पद्धत योग्य नसून, संपूर्ण ऑपरेशनल सिस्टीम, मेंटेनन्स आणि व्यवस्थापन प्रक्रियेची जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

23 फेब्रुवारी 2026 रोजी झारखंडमधील चतरा येथे एक भीषण एअर ॲम्ब्युलन्स अपघात झाला होता. रांचीहून दिल्लीकडे निघालेले रेडबर्ड कंपनीचे बीचक्राफ्ट किंग एअर B90L हे विमान संध्याकाळी 7:11 वाजता उड्डाण केले होते. मात्र 7:34 वाजता विमानाशी संपर्क तुटला आणि काही वेळातच ते चतरा जिल्ह्यातील समरिया जंगल परिसरात कोसळले. या अपघातात विमानातील सर्व सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये कॅप्टन विवेक विकास भगत आणि कॅप्टन सबराजदीप सिंग यांच्यासह रुग्ण, त्याचे नातेवाईक, डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफचा समावेश होता. या घटनेने देशभरात खळबळ उडाली आणि चार्टर्ड विमानांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले.

त्याआधी 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही चार्टर्ड विमान अपघातात निधन झाले होते. बारामती विमानतळावर लँडिंग करताना त्यांचे विमान कोसळले. प्राथमिक माहितीनुसार, धावपट्टी स्पष्ट दिसत नसल्याने पायलटने पहिले लँडिंग अयशस्वी ठरल्यानंतर पुन्हा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या प्रयत्नात विमान धावपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच कोसळले आणि त्याला आग लागली. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता.

गेल्या एका महिन्यात घडलेल्या या दोन मोठ्या अपघातांनंतर चार्टर्ड विमान सेवांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. डीजीसीएच्या नव्या नियमांमुळे ऑपरेटर कंपन्यांवर अधिक जबाबदारी येणार असून, पारदर्शकता आणि सुरक्षा मानकांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande