लासलगाव - कांदा उत्पादक आक्रमक; लिलाव पाडले बंद
Lasalgavi onion producers are aggressive
लासलगाव - कांदा उत्पादक आक्रमक; लिलाव पाडले बंद


लासलगाव, 25 फेब्रुवारी (हिं.स.)आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू होताच लाल कांद्याचे बाजारभाव घसरल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सुमारे एक तास लिलाव बंद पाडले त्यानंतर बाजार समितीत प्रशासनाने मध्यस्थी केल्याने लिलाव पूर्ववत सुरू झाले.

लासलगाव सह राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कांदा दरात मोठी घसरण सुरू झाली आहे.असे असतानाच लासलगाव बाजार समितीत बुधवारी लाल कांद्याचे दर प्रतिक्विंटल आठशे रुपये पर्यंत खाली घसरल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सुमारे एक तास लिलाव बंद पाडले.

कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी, मातीमोल भावात होणारी विक्री टाळण्यासाठी आणि उत्पादन खर्च निधून येण्यासाठी राज्य सरकारने आधारभूत दर निश्चित करून ‘भावांतर योजना’ लागू करावी, तसेच कांदा उत्पादकांना प्रत्येकी दोन हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावे अशी जोरदार मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी यावेळी केली.जेव्हा कांद्याचे भाव वाढतात,तेव्हा केंद्र सरकारच्या विविध समित्या तातडीने बाजार समित्यांमध्ये दाखल होतात. मात्र, भाव पडल्यावर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली

यावेळी बोलताना निंबाळकर म्हणाले की,खते,पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.अशा परिस्थितीत शेतकऱ्याला दोन पैसे मिळण्यासाठी कांद्याला किमान २० रुपये प्रति किलो (२ हजार रुपये प्रति क्विंटल) भाव मिळणे आवश्यक आहे. सध्या बाजारात मिळणारा बाजार भाव हा शेतकऱ्यांची थट्टा करणारा आहे.

नाशिक येथे जिल्हा पणन अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक यांच्यासोबत या विषयावर महत्त्वाची बैठक होणार असल्याचे निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.चांदवडमध्येही याच मुद्द्यांवरून उपोषण सुरू आहे.जर या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही,तर आम्ही मागे हटणार नाही.विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात कांद्याचे ट्रॅक्टर नेऊन आंदोलन करण्याचा इशाराही गणेश निंबाळकर यांनी दिला आहे.

या आंदोलनाप्रसंगी लासलगाव बाजार समितीचे सभापती डी. के. जगताप,उपसभापती दलित दरेकर, सचिव नरेंद्र वाढवणे,व्यापारी प्रवीण कदम,बाळासाहेब दराडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी तसेच मातीमोल भावात होणारी विक्री टाळण्यासाठी आणि उत्पादन खर्च निधून येण्यासाठी सरकारने आधारभूत दर निश्चित करून ‘भावांतर योजना’ लागू करावी तसेच कांदा उत्पादकांना प्रत्येकी दोन हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावे अन्यथा येणाऱ्या काळात मोठे आंदोलन करण्यात येईल – गणेश निंबाळकर, नाशिक जिल्हा अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष

कांदा दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले होते.याप्रश्नी आम्ही शासन स्तरावर निवेदन दिले असून मंत्री छगन भुजबळ,मंत्री गिरीश महाजन तसेच पणन मंत्री यांच्याशीही चर्चा केली आहे.शेतकरी बांधवांची समजूत काढून आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधून लिलाव पुन्हा सुरू केले आहेत.शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील.

– डी. के. जगताप, सभापती लासलगाव बाजार समिती

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande