ओडिशात खाण अधिकाऱ्याच्या घरातून ४ कोटींची रोकड जप्त
भुवनेश्वर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने कटक सर्कलमधील खाणींचे उपसंचालक देवव्रत मोहंती यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल
Cash  4 crore seized Odisha mining official house


भुवनेश्वर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने कटक सर्कलमधील खाणींचे उपसंचालक देवव्रत मोहंती यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल चार कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. राज्याच्या इतिहासातील दक्षता विभागाने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी रोख जप्ती असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कटक सर्कलमध्ये कार्यरत असलेले खाणींचे उपसंचालक देवव्रत मोहंती यांनी एका परवानाधारक कोळसा व्यापाऱ्याकडून त्याचा कोळसा डेपो सुरळीत चालवण्यासाठी आणि कोळशाच्या वाहतुकीला परवानगी देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या तक्रारीनंतर ओडिशा दक्षता विभागाने सापळा रचत मंगळवारी कारवाई केली आणि मोहंती यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून लाचेची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली असून तत्काळ त्यांना अटक करण्यात आली.

अटकेनंतर दक्षता विभागाने एकाच वेळी तीन ठिकाणी धाड टाकली. भुवनेश्वर येथील त्यांच्या निवासस्थानी, भद्रक जिल्ह्यातील मथासाही येथील वडिलोपार्जित घरी तसेच कटक येथील कार्यालयातील दालनात झडती घेण्यात आली. भुवनेश्वरमधील पाटिया परिसरातील श्रीविहार नेचर क्रेस्ट अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. ही रक्कम ट्रॉली बॅग आणि कपाटांमध्ये लपवून ठेवण्यात आली होती. प्राथमिक माहितीनुसार, जप्त केलेली रक्कम चार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

सध्या जप्त केलेल्या रोकड रकमेची मोजणी सुरू असून अंतिम आकडा मोजणी पूर्ण झाल्यानंतर जाहीर केला जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, राज्यातील सतर्कता विभागाच्या कारवाईत इतक्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या धाडीतून मोहंती यांच्या इतर संपत्तीबाबतही माहिती समोर आली आहे. भुवनेश्वरमधील पहाला परिसरात त्यांचे दुमजली घर असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय सुमारे १३० ग्रॅम सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांकडून इतर मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असून बेहिशोबी संपत्तीबाबत अधिक तपास केला जात आहे.

या कारवाईमुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेला अधिक वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दक्षता विभागाच्या या मोठ्या कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande